|| अमृतांशू नेरुरकर

ओपन सोर्स व्यवस्थेने परंपरागत बौद्धिक संपदा हक्कांची व्याख्या बदलवून सॉफ्टवेअर क्षेत्रात मोठी उलथापालथ घडवली. या व्यवस्थेबद्दल फारसं साहित्य उपलब्ध नाहीच. म्हणूनच जाणीवपूर्वक अतिशय महत्त्वाचा हा विषय आम्ही निवडला होता. या स्तंभातील हा शेवटचा लेख..

या लेखमालेतला हा अखेरचा लेख लिहिताना मला रवींद्रनाथ टागोरांच्या ‘चित्तो जेथा भयोशून्यो’ (where mind is without fear) या अजरामर कवितेची सतत आठवण होत आहे. या द्रष्टय़ा कवीने जवळपास १०० वर्षांपूर्वीच अशा एका भयमुक्त जगाचं स्वप्नं पाहिलं होतं की जिथे ज्ञानग्रहण व संवर्धन कसल्याही भेदाभेदाशिवाय मुक्तपणे होऊ  शकेल (व्हेअर नॉलेज इज फ्री!). ओपन सोर्स चळवळीने व त्यातून जन्माला आलेल्या व्यवस्थेने आज हे स्वप्नं (निदान सॉफ्टवेअरपुरतं तरी) सत्यात उतरवण्याचा  प्रयत्न केला आहे. ही लेखमाला लिहिण्यामागेसुद्धा रवींद्रनाथांच्या याच उदात्त विचारांची प्रेरणा आहे असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही.

मी जरी २००२ सालापासून माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात होतो तरीही २००८ सालापर्यंत मी ओपन सोर्स व्यवस्थेबद्दल जवळपास अनभिज्ञ होतो. २००९ साली मला रेड हॅट, आयआयटी मुंबई आणि आयआयएम बेंगळूरुने संयुक्तपणे हाती घेतलेल्या एका संशोधन प्रकल्पात काम करण्याची संधी मिळाली. भारतात वैयक्तिक आणि व्यावसायिक स्तरावर ओपन सोर्सबद्दल कितपत जागरूकता आहे व ती कशी वृद्धिंगत करता येईल याचा अभ्यास करण्यासाठी हा प्रकल्प हाती घेतला होता.  या प्रकल्पामुळे मला ओपन सोर्स व्यवस्थेला जवळून न्याहाळण्याची सुवर्णसंधी मिळाली.

यातून या व्यवस्थेची झालेली जुजबी ओळखदेखील या व्यवस्थेबद्दलचं कुतूहल जागृत करण्यास पुरेशी होती. मग हे कुतूहल शमविण्यासाठी मी पुढची काही वर्षे ओपन सोर्ससंदर्भात छापलेला शब्दन्शब्द अधाशासारखा वाचून काढला. त्याच्याच जोडीने भारतात या चळवळीशी निगडित असलेल्या अनेकांच्या भेटी घेतल्या, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील विविध परिषदांमध्ये ओपन सोर्स व्यवस्थापन तसेच ओपन सोर्सच्या विस्तारणाऱ्या क्षितिजावर शोधनिबंध सादर केले. व्यावसायिक स्तरावर मी रेड हॅटशी जोडला गेलो होतोच ज्यामुळे मला त्यांच्या संशोधन प्रकल्पांत सक्रिय सहभाग देता आला व त्याचबरोबर त्यांच्या दक्षिण-पूर्व आशियामध्ये प्रकाशित होणाऱ्या संशोधनपर साहित्याचे संपादनही करता आले.

यातून माझी ओपन सोर्स व्यवस्थेबद्दलची जाणीव समृद्ध होत गेली. त्याचवेळेला माझ्या असंसुद्धा लक्षात येऊ  लागलं की ओपन सोर्स व्यवस्थेने परंपरागत बौद्धिक संपदा हक्कांची व्याख्या बदलवून सॉफ्टवेअर क्षेत्रात मोठी उलथापालथ घडवली असली तरीही या व्यवस्थेबद्दल फारसं साहित्य मराठीत तर सोडाच पण इंग्रजीतही उपलब्ध नाही. आजही ओपन सोर्सबद्दल माहिती करून घेण्यासाठी एरीक रेमंडसारख्या सॉफ्टवेअर क्षेत्रातल्या भाष्यकारांनी दीड-दोन दशकांपूर्वी लिहिलेल्या साहित्याचाच आधार घ्यावा लागतो. जगभरातल्या विविध परिषदांमध्ये सादर झालेलं किंवा संशोधनपर नियतकालिकांत छापून आलेलं साहित्य विपुल प्रमाणात असलं तरीही ते ज्ञान लोकांमध्ये झिरपण्यास दोन प्रमुख समस्या आहेत. एक तर ते साहित्य विस्कळीतपणे तुकडय़ातुकडय़ात उपलब्ध आहे. त्याला अभ्यासण्यासाठी ते एकसंध स्वरूपात उपलब्ध करून द्यावं लागेल जे फार जिकिरीचं आणि वेळकाढू काम आहे. दुसरं म्हणजे तो अकादेमिक दस्तऐवज असल्याने त्याची भाषा तर क्लिष्ट आहेच पण त्यात वाचकाची एक विशिष्ट पातळी गृहीत धरण्यात आलेली आहे. त्यामुळे हे साहित्य सामान्य वाचकांच्या आकलनापलीकडे आहे.

याच कारणांमुळे या विषयावरील आपल्या अभ्यासाचा व अनुभवाचा उपयोग करून एक लेखमाला मराठीत लिहावी असे विचार गेली दोन-अडीच र्वष सतत मनात यायचे. अशी स्वप्नं बघणं सोपं असलं तरीही ती प्रत्यक्षात उतरणं महाकठीण असतं याची जाणीव मला होती. एक तर अशा अनवट विषयाचं वाचक किती स्वागत करतील ही धास्ती होती. दुसरं म्हणजे वर्षभर पुरेल इतका मजकूर या विषयावर उपलब्ध असेल का याची शाश्वती नव्हती. त्यामुळे मलाच या विषयाचा पुनश्च मुळापासून अभ्यास करणं क्रमप्राप्त होतं. तिसरं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माझा या आणि एकंदरीतच संगणक विषयाचा सर्व अभ्यास, संशोधन व थोडंबहुत लिखाण इंग्रजीतच झालं असल्याने मराठीत लिहिताना मी या विषयाला कितपत न्याय देऊ  शकेन व त्याच वेळेला वाचकांसाठी ते कितपत रंजक बनवू शकेन याची मलाच खात्री देता येत नव्हती.

माझ्या वरील तीनही शंकांचं यथोचित निरसन करून ‘लोकसत्ता’चे संपादक गिरीश कुबेर सरांनी मला प्रथमत: आश्वस्त केलं. ही लेखमाला आज ज्या स्वरूपात वाचकांसमोर येत आहे त्याचं सारं श्रेय नि:संशय त्यांचं आहे. या लेखमालेचं शीर्षक ठरवणं, माझे सुरुवातीचे लेख वाचून मला मौलिक सूचना करणं तसंच वेळोवेळी शाबासकीची थाप पाठीवर देऊन उत्साह वाढवणं अशा अनेक पद्धतींनी पूर्ण वर्षभर त्यांचा या लेखमालेत सक्रिय सहभाग राहिला. अशा अनवट विषयावर वर्षभर चालणारी साप्ताहिक लेखमाला छापण्याचं धैर्य दाखवल्याबद्दल मी  ‘लोकसत्ता’चा मन:पूर्वक आभारी आहे.

हा विषय व्यापक असल्याने केवळ इतिहासातच न रमता या विषयाच्या सर्व पैलूंना (तात्त्विक, मानसशास्त्रीय, आर्थिक, व्यवस्थापकीय, सामाजिक वगैरे) अभ्यासून त्यांचा विस्तृत परामर्श घेण्याचं मी सुरुवातीपासूनच ठरवलं होतं. यामुळे लेख काही प्रमाणात कंटाळवाणे ठरण्याची भीती होती. पण ओपन सोर्सच्या समग्र अभ्यासाच्या दृष्टीने ते आवश्यक होतं. म्हणूनच प्रत्येक लेख लिहिताना तो सोप्या भाषेत, तांत्रिक क्लिष्टता टाळून अधिकाधिक संवादात्मक होईल यासाठी मी प्रामाणिक प्रयत्न केला. आपण लिहिलेला लेख एक वाचक म्हणून तटस्थपणे स्वत:लाच वाचनीय वाटतोय का हाच एक प्रमुख निकष मी कोणत्याही लेखाचा अंतिम मसुदा तयार करताना लावला. प्रत्येक लेखानंतर आलेल्या वाचकांच्या उदंड प्रतिसादामुळे मी या विषयाला काही प्रमाणात तरी न्याय देण्यात यशस्वी झालो असेन असं मनापासून वाटतं.

या सदराला मिळालेल्या वाचकांच्या (माझ्या मताप्रमाणे अनपेक्षित) प्रतिसादामुळे मी खरोखरीच भारावून गेलो. उच्चस्तरीय सनदी अधिकारी, आयआयटीसारख्या संस्थांचे प्राध्यापक, माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील तज्ज्ञ व अभियांत्रिकीचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांपासून सामान्य वाचकांपर्यंत अनेकांचे नियमितपणे या लेखमालेवर प्रतिसाद आले. केवळ महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातूनच नाही तर जिथे जिथे सुजाण मराठी वाचक आहे अशा भारतातील इतर शहरांतून आणि त्याचबरोबर अमेरिका, ऑस्ट्रेलिया व इंग्लंडमधील वाचकांचेसुद्धा पुष्कळ अभिप्राय आले. काहींनी या लेखांच्या इंग्रजी भाषांतराची पृच्छा केली तर अनेकांनी या लेखांचं पुस्तक संग्रही ठेवण्यास आवडेल असंही कळवलं. या नेमानेभल्याबुऱ्या प्रतिक्रिया नोंदवणाऱ्या व मला व्यक्तिश: समृद्ध करणाऱ्या सर्व वाचकांचा मी ऋणी आहे.

हा हा म्हणता वर्ष सरलं. लेखमालेच्या सुरुवातीला वर्षभर पुरेल इतका मजकूर लिहिता येईल का याची धाकधूक होती. आज हे अखेरचं सदर लिहिताना ओपन सोर्सशी निगडित काही विषयांवर अधिक विस्ताराने लिहायचं वेळेअभावी राहून गेलं याची रुखरुख असली तरीही या वेगळ्या धाटणीच्या विषयावर विशेषकरून मराठीत लिहायला मिळाल्याचं आत्मिक समाधानही आहे. मागील लेखात म्हटल्याप्रमाणे ओपन सोर्स सॉफ्टवेअरची सर्वात जास्त गरज आज भारतासारख्या देशाला आहे. या लेखमालिकेमुळे जर काही तरुणांना या विलक्षण लोकचळवळीमध्ये झोकून देण्याची थोडीशी जरी ऊर्मी मिळाली तरी महाजालाच्या या मुक्तायनाचं चीज झालं असं मी समजेन.

या लेखमालेसंदर्भात एक छान योगायोग जुळून आला होता. ‘लोकसत्ता’मध्ये या वर्षांची सुरुवात (१ जानेवारीला) या सदराने झाली होती व या वर्षांचा शेवटही आज याच सदराने होत आहे. वर्षभराच्या या उत्कट आणि हव्याहव्याशा अनुभवामुळे अनेक नवे संकल्प उराशी बाळगले आहेत, ज्यामुळे तुमच्याबरोबरचा हा संवाद अविरत चालू राहील याची खात्री वाटते. म्हणूनच तुम्हाला नूतन वर्षांच्या शुभेच्छा देण्याबरोबरच या लेखमालेच्या शेवटी प्रख्यात उर्दू शायर डॉ. बशीर बद्र यांचा एका शेर उद्धृत करावासा वाटतो, की ‘मुसाफिर हैं हम भी, मुसाफिर हो तुम भी, किसी मोड पर फिर मुलाकात होगी.’

amrutaunshu@gmail.com

लेखक माहिती व तंत्रज्ञान क्षेत्रातील तज्ज्ञ आहेत.