छत्तीसगड राज्यातील सुकमा जिल्ह्य़ात सोमवारी संध्याकाळी नक्षलवाद्यांनी घडवून आणलेल्या सुरुंग स्फोटात केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या दोन अधिकाऱ्यांसह १४ जवान शहीद झाले. नक्षलवाद्यांची संख्या मोठी आहे, याची माहिती असतानाही रस्ता मोकळा न करताच हे जवान शोधमोहिमेवर गेल्याने ही घटना घडल्याचे स्पष्ट झाले आहे.
सुकमा जिल्ह्य़ातील कोंटा तालुक्यात दोरनापालपासून ३२ किलोमीटर अंतरावरील कसनपारा या गावाजवळच्या जंगलात नक्षलवाद्यांनी हा हल्ला घडवून आणला. या जंगलात मोठय़ा संख्येने नक्षलवादी जमले आहेत, अशी माहिती या भागात तैनात असलेल्या केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) अधिकाऱ्यांना मिळाली होती. त्यानुसार सोमवारी सकाळपासून या भागात शोधमोहीम सुरू करण्यात आली. या मोहिमेत सीआरपीएफचे जवान, कोब्रा बटालियनचे जवान, तसेच स्थानिक पोलीसही सहभागी झाले होते. चिंतागुफापासून सहा किलोमीटर अंतरावर हे जवान असताना नक्षलवाद्यांनी त्यांना घेरून तुफान गोळीबार सुरू केला. या जवानांनी प्रत्युत्तर देण्याचा तोकडा प्रयत्न केला. याच वेळी नक्षलवाद्यांनी रस्त्याच्या दोन्ही बाजूला दडवून ठेवलेल्या सुरुंगांचा स्फोट घडवून आणला. त्यात या जवानांना वीरमरण आले.