जिल्ह्यात शनिवारी दुपापर्यंत २१ नवीन रुग्णांची भर पडल्याने करोना बाधितांची संख्या १०२ वर पोहचली आहे. त्यात एकटय़ा धुळे शहरात १५ रूग्ण वाढल्याने महापालिका आणि जिल्हा प्रशासनाची डोकेदुखी वाढली आहे. आतापर्यंत जिल्ह्यात ११ जणांचा मृत्यू झाला असून एकूण ४८ जण करोनामुक्त झाले आहेत.

जिल्ह्यात गुरुवारी नवीन एकही रुग्ण आढळलेला नव्हता. ४० अहवाल नकारात्मक आले होते. शुक्रवारी जिल्हा सामान्य रुग्णालय (जुने सामान्य रूग्णालय) मधील चार जणांचे आणि सर्वोपचार रुग्णालयात दाखल १७ जणांचे अहवाल सकारात्मक आल्याने एकाच दिवसात २१ नवीन रुग्ण पहिल्यांदाच जिल्ह्यात आढळले. त्यात शिंदखेडा तालुक्यातील दोन, वाडीशेवाडी गावातील दोन, तसेच बल्हाणे येथील दोन, धुळे तालुक्यातील शिरूड गावातील एक रूग्णांचा समावेश आहे.

नवीन २१ रुग्णांमध्ये सर्वाधिक १५ जण हे धुळे शहरातील आहेत. देवपूर भागातील संत सेना नगरात ४१ वर्ष वयाच्या दोन पुरुष, टपाल कार्यालयातील ३९ वर्षांचा पुरूष, चक्करबर्डी पाईप फॅक्टरीजवळ ४७ वर्षांची महिला, ५० आणि २२ वर्षांचे पुरूष, बिलाडी रोड भागात नऊ वर्षांची मुलगी, कोरके नगरात ३३ वर्षांचा पुरुष, हजारखोलीतील ५७ वर्षांची महिला, चितोड रोड येथील मयत करोनाबाधिताची ४७ वर्षांची पत्नी, जमनागिरी रोड येथे राहणारा ५८ वर्षांचा आणि गल्ली नंबर चार येथील ५० वर्षांचा पुरूष, त्याची ४५ वर्षांची पत्नी यांचा समावेश आहे.

त्याशिवाय भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या सर्वोपचार रुग्णालयात कोविड कक्षात सेवा देणाऱ्या दोन परिचारिका असल्याची माहिती जिल्हा रुग्णालयाचे करोना कक्षप्रमुख अधिकारी डॉ. विशाल पाटील यांनी दिली आहे.

सुरक्षित मिल परिसरही करोनाबाधित

धुळे शहरातील आतापर्यंत सुरक्षित राहिलेल्या मिल परिसरात करोनाचा विळखा पडला आहे. नव्याने आढळलेल्या २१ रुग्णांपैकी सहा जण याच परिसरातील आहेत. हा परिसर दाटीवाटीचा असल्याने आयुक्तांनी तसेच पोलीस अधिक्षकांनी या भागात कठोर उपाय करण्याची गरज आहे. हटकरवाडी, चक्करबर्डी, संभाप्पा कॉलनी, शिवसागर कॉलनी येथील हे रूग्ण आहेत. शहरात टाळेबंदी सुरु असतांना मिल परिसरात मात्र आठवडय़ाभरात पोलिसांची साधी गस्तही सुरू नाही. जवळपास सर्वच दुकाने पूर्णवेळ सुरु ठेवली जात आहेत. विनाकारण फिरणाऱ्या आणि नियम न पाळणाऱ्यांविरूध्द पोलिसांनी कारवाई करण्याची गरज आहे. मिल परिसर हा अत्यंत दाट वस्तीचा आणि सर्वसामान्य नागरी वस्तीचा भाग आहे. प्रभाग क्रमांक १७ मधील सर्व नागरिकांची घरोघरी जावून महापालिका आरोग्य पथकाने आरोग्य तपासणी करावी, अशी मागणी नगरसेवक बंटी मासुळे आणि नगरसेविका सुरेखा उगले यांनी केली आहे.