महाआरोग्य शिबिराचे थाटात उद्घाटन
येथील वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल करण्यासाठी १५० कोटी रुपये मंजूर करण्यात आले असून त्यातील ७० टक्के केंद्र सरकार आणि ३० टक्के रकमेचा भार राज्य सरकार उचलणार आहे. ऑगस्टमध्ये सुपरस्पेशालिटी हॉस्पिटलचे भूमिपूजन होणार असून तीन वर्षांच्या आत ते पूर्णत्वास जाण्यासाठी सरकार युध्दस्तरावर प्रयत्न करेल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे केली आहे.
प्रत्येक नागरिकाला उत्तम आरोग्यसेवा मिळावी, यासाठी राज्यातील प्रत्येक जिल्ह्य़ात महाआरोग्य शिबीर आयोजित करण्याचा संकल्प असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. रविवारी वैद्यकीय महाविद्यालयाच्या भव्य प्रांगणावर झालेल्या महाआरोग्य शिबिराचे उद्घाटन त्यांच्या हस्ते झाले. यावेळी २० हजारावर रुग्णांची तपासणी करून त्यांच्यावर उपचाराची व्यवस्था करण्यात आली, अशी माहिती पालकमंत्री संजय राठोड यांनी दिली. यासाठी मुंबई, पुण्याकडील शंभर आणि जिल्ह्य़ातील २००, असे विविध १०० रोगतज्ज्ञांनी या शिबिरात सेवा दिली. शिबिरासाठी विविध समित्यांचे गठन करण्यात आले असून शेकडो स्वयंसेवी संघटना आणि स्वयंसेवकांच्या सहकार्याने हे शिबीर पार पडले. यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्रे, ग्रामीण रुग्णालये, उपजिल्हा रुग्णालये इत्यादी ठिकाणी रुग्ण नोंदणी सुरू असून अत्यंत दुर्धर आजाराचे ५ हजार रुग्ण आढळल्याची माहिती अधिष्ठाता डॉ. अशोक राठोड यांनी दिली.
यावेळी गृह राज्यमंत्री डॉ. रणजित पाटील, परिवहनमंत्री दिवाकर रावते, मंत्री गिरीश बापट, आमदार मदन येरावार यांची भाषणे झाली. खासदार भावना गवळी, डॉ. विकास महात्मे, डॉ. तात्याराव लहाने, आमदार मनोहर नाईक, अशोक उईके, संजीवरेड्डी बोदकुरवार, राजेंद्र नजरधने, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. के.झेड. राठोड, जिल्हाधिकारी एस.पी. सिंह, सीईओ दीपक सिंगला, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.टी.जी.धोटे, जिल्हा आरोग्य अधिकारी, तसेच विविध विभागाचे उच्चाधिकारी हजर होते. महाआरोग्य शिबिराच्या निमित्ताने वैद्यकीय महाविद्यालयाचा सारा परिसर गजबजून गेला होता.
महाआरोग्य शिबिरात मुख्यमंत्र्यांसमोर घोषणाबाजी करून संपूर्ण जिल्हा दारूबंदीची मागणी करणाऱ्या स्वामिनी संघटनेचे अध्यक्ष महेश पवार यांच्यासह दहा कार्यकर्त्यांना पोलिसांनी अटक केली.

असा केला दुष्काळ जाहीर..
दुष्काळ जाहीर करण्यात शासनाला विलंब झाला, हे कबूल करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, पीक पसेवारी ५० टक्क्यापेक्षा अधिक असल्याच्या प्राथमिक अहवालाच्या आधारे हा उशीर झाला. मात्र, गेल्या तीन वर्षांत सातत्याने दुष्काळ स्थिती असल्याने केंद्र सरकारला विशेषत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना साकडे घालून केंद्र सरकारची मदत मिळवून दुष्काळ जाहीर केला. शेतकऱ्यांसाठी बळीराजा चेतना अभियान, वसंतराव नाईक शेतकरी स्वावलंबी योजना, पीक विमा योजनासारखे प्रकल्प हाती घेतले आहे. गंमत अशी की, उच्च न्यायालयाच्या आदेशावरून दुष्काळ जाहीर केला, या गोष्टीचा उल्लेख मात्र मुख्यमंत्र्यांनी केला नाही, याचीच यावेळी जास्त चर्चा होती.

शस्त्रक्रिया करण्यात सीएम एक्स्पर्ट -रावते
महाआरोग्य शिबिराच्या निमित्ताने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अंगभूत गुणांचे वर्णन करताना शिवसेना नेते परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी धमाल उडवली. रावते म्हणाले की, मुख्यमंत्री कोणत्याही रोगावर ‘शस्त्रक्रिया’ करण्यात तरबेज आहेत, हे त्यांनी कालच दाखवून दिले. राजीनामा दिलेले भाजप नेते एकनाथ खडसेंच्या प्रकरणाचा उल्लेख न करता रावते यांनी मुख्यमंत्र्यांची तारीफ करून टाळ्या घेतल्या. खडसेंच्या राजीनाम्याने भाजपपेक्षाही शिवसेनेला किती आनंद झाला, हे रावते यांनी जाहीररीत्या दाखवून दिले.

मुख्यमंत्र्यांकडून लोकसत्ताची दखल
लोकसत्ताच्या रविवारच्या अंकातील ‘नोकरशाहीच्या हातात सत्ता केंद्रित, मुख्यमंत्र्यांना प्रशासनाचेच आव्हान’ या मथळ्याच्या बातमीची मुख्यमंत्र्यांनी आल्या आल्या दखल घेतली. विमानतळावर उतरताच त्यांनी अधिकाऱ्यांकडून ‘लोकसत्ता’ मागवून घेतला आणि गाडीत बातमी वाचली. त्यासंदर्भात त्यांनी सचिवांशी चर्चा केली. चर्चेचा तपशील मात्र समजला नाही. जिल्ह्य़ात प्रशासनाच्या हाती सत्ता केंद्रित होऊन सामान्य माणसाची गळचेपी होत आहे. प्रशासनावर शासनाचे अजिबात नियंत्रण नसल्याचा हा परिणाम आहे, असा गंभीर आरोप माजी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी केला आहे.