|| रवींद्र केसकर

भूकंपानंतर निराधार झालेल्या अनाथांची यशोगाथा

उस्मानाबाद आणि लातूर या दोन जिल्ह्य़ांना २५ वर्षांपूर्वी ३० सप्टेंबरला पहाटे भूकंपाने जबर तडाखा दिला. या धक्क्यातून जिद्दीने सावरत पुढच्या पिढीने वाटचाल केली आहे. सरकार तसेच समाज व स्वयंसेवी संस्थांच्या पाठबळातून ही वाटचाल झाली आहे ..

प्रकाशचा पुण्यात स्वतचा व्यवसाय आहे. मागील वर्षी त्याने ३८ हजार रुपयांचा आयकर जमा केला आहे. उद्धव आता आदर्श शिक्षक झाला आहे. अमोल अभियंता आहे. त्याची पत्नीसुद्धा त्याच्यासोबत अभियंता म्हणून कार्यरत आहे. सावली ऑस्ट्रोलियात नìसगची नोकरी सांभाळत आपल्या कुटुंबाला आधार देत आहे. भूकंपानंतर परिस्थितीने निर्माण केलेल्या संकटांशी अशरण वृत्तीने झुंजणाऱ्या या तरुणांचा प्रवास प्रेरणादायी असाच आहे. भूकंपानंतर मातीच्या ढिगाऱ्यातून झेपावलेले हे फिनिक्स जगाच्या कानाकोपऱ्यात स्वतच्या कर्तृत्वाने आपली नवी ओळख आता सिद्ध करू लागले आहेत.

उस्मानाबाद आणि लातूर या दोन जिल्ह्य़ांना २५ वर्षांपूर्वी भूकंपाने जबर तडाखा दिला. नेमके काय घडत आहे, हे उमजण्याअगोदर होत्याचे नव्हते झाले. आई-वडिलांच्या अंगाखांद्यावर खेळणारे चिमुकले एका क्षणात अनाथ होऊन गेले. या घटनेला आता अडीच दशक पूर्ण होत आहे. भूकंपानंतर मातीच्या ढिगाऱ्याखाली अडकलेल्या निराधार, अनाथ मुलांनी घेतलेली ही झेप थक्क करणारी आहे. विशेष म्हणजे डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची हत्त्या झाल्यानंतर सर्वप्रथम रस्त्यावर उतरत एकमेकांच्या संपर्कात असलेल्या भूकंपग्रस्त भागातील या तरुणांनी निषेध नोंदवला होता.

१९९३चा महाप्रलयंकारी भूकंप झाला त्यावेळी अमोल गायकवाड इयत्ता पहिलीत शिकत होता. उमरगा तालुक्यातील जकेकूर या गावालाही भूकंपाचा जोरदार हादरा बसला. एका क्षणात घराचे रूपांतर मातीच्या ढिगाऱ्यात झाले. शेतमजूर असलेल्या आई-वडिलांचा जीव खचला. इयत्ता तिसरीला असताना त्याला राष्ट्र सेवा दल संचालित आपलं घर येथे दाखल करण्यात आले. आता अमोल ‘एम-टेक’ झाला आहे. टाटा मोटर्स या प्रथितयश संस्थेत अभियंता संशोधन केंद्र (इआरसी) या विभागात तो कार्यरत आहे. २०१० पासून पुण्यात वास्तव्यास असलेल्या अमोलने स्वतचा संसार चांगला थाटला आहे. चार वर्षांच्या आपल्या मुलाकडे पाहिल्यानंतर भूकंपातून इथपर्यंत केलेला प्रवास डोळ्यासमोर उभा राहतो, अशा शब्दात त्याने आपल्या भावना व्यक्त केल्या.

लातूर जिल्ह्य़ातील किल्लारीला भूकंपाचा सर्वात मोठा तडाखा सोसावा लागला. शिवकंठ दिवटे याचे किल्लारी हे आजोळ. भूकंपात होत्याचे नव्हते झाले आणि हिप्परगा येथील शिवकंठ याच्या आईला मानसिक आघात झाला. पुढे त्यातच तिचे निधन झाले आणि छत्र हरवलेल्या शिवकंठला ‘आपलं घर’ने आधार दिला. आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू हरभजनसिंग याचा ड्रायव्हर म्हणून शिवकंठ दिवटे याने काम केले आहे. सध्या पुण्यात स्वतची गाडी घेवून भूतकाळातील वेदनेची तीव्रता स्वकष्टातून गाडण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे तो सांगतो.

सावली शिंदे सध्या ऑस्ट्रेलिया येथील सिडनी या शहरात नर्स म्हणून कार्यरत आहे. भूकंपाच्या जुन्या आठवणीबाबत बोलण्याची इच्छाही नसल्याचे तिचे पती रोहन शिंदे यांनी सांगितले. मात्र आपण सहन केलेला त्रास अन्य कोणाच्या वाटय़ाला येवू नये, यासाठी सावलीने गतवर्षी ‘आपलं घर’ला एक लाख रुपये देणगी दिली. १९९३ साली इयत्ता सहावीत शिकणारा प्रकाश जगताप आता पुण्यातील एका टूर्स अ‍ॅण्ड ट्रॅव्हल्स कंपनीचा मालक आहे. अनाथ प्रकाशने घेतलेली ही झेप थक्क करणारी आहे. तो जर्मनी येथील एका कंपनीला पुण्यात आपल्या कंपनीची सेवा देतो. मागील वर्षीचे त्याचे वार्षकि उत्पन्न १२ लाख रुपये होते. भूकंपानंतर सर्वकाही मातीमोल झाले. ते दुख विसरून प्रकाश जगताप याने नवीन विश्व निर्माण केले आहे. त्यातून अनेकांना रोजगारदेखील तो उपलब्ध करून देत आहे.

प्रकाश जगताप याचा वर्गमित्र असलेल्या भरूनाथ उघडे यानेही मोठय़ा कष्टाने मागील परिस्थितीला पराभूत करून स्वतला सिद्ध केले आहे. मारुती सुझुकी कंपनीच्या पुणे येथील एका शोरूममध्ये तो विभागप्रमुख म्हणून कार्यरत आहे. चांगला पाच आकडी पगार दरमाह मिळत असला तरी २५ वर्षांपूर्वी भूकंपाने मनावर केलेला आघात अस्वस्थ करून जात असल्याचे त्याने सांगितले.

२५ वर्षांनंतर स्वतच्या प्रयत्नातून मोठी झालेली पिढी आता नव्याने या परिसराला झळाळी मिळवून देण्याचा प्रयत्न करीत आहे. वरीलप्रमाणेच अनेक गावांतील तरुणांनी भूकंपातील दुख, वेदना बाजूला सारून जग कवेत घेण्यासाठी आपले कौशल्य पणाला लावले आहे , त्याला समाज, विविध संस्था, संघटना यांनी हातभार लावून मदतही केली आहे.