महाराष्ट्रात २९४० नवे करोना रुग्ण आढळले आहेत. तर ९९ जणांचा मृत्यू करोनाची लागण होऊन झाला आहे. त्यामुळे आता राज्यातील करोना रुग्णांची संख्या ६५ हजार १६८ इतकी झाली आहे. गेल्या चोवीस तासात ९९ जणांचा मृत्यू झाला आहे. महाराष्ट्रात आत्तापर्यंत एकूण २१९७ रुग्णांचा मृत्यू करोनामुळे झाला आहे. महाराष्ट्राच्या आरोग्य विभागाने ही माहिती दिली आहे.

आज राज्यात १ हजार ८४ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. राज्यात आत्तापर्यंत २८ हजार ८१ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे असंही आरोग्य विभागाने स्पष्ट केलं आहे. राज्यात सध्याच्या घडीला ३४ हजार ८८१ अॅक्टिव्ह केसेस आहेत असंही आरोग्य विभागाने सांगितलं आहे. राज्यातला करोना रुग्ण दुप्पट होण्याचा वेग आता १७.५ दिवस झाला आहे. राज्यातील रिकव्हरी रेट अर्थात रोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ४३.७ टक्के एवढे आहे. सध्या राज्यात ५ लाख ५१ हजार ६६० लोक होम क्वारंटाइन आहेत. तर ३५ हजार ४२० लोक संस्थात्मक क्वारंटाइन आहेत. संस्थात्मक क्वारंटाइनसाठी ७२ हजार ६८१ बेड्स उपलब्ध करण्यात आले आहेत अशीही माहिती आरोग्य विभागाने दिली आहे.

राज्यात ९९ करोना रुग्णांचा गेल्या २४ तासांमध्ये मृत्यू झाला आहे. ज्यामध्ये ६२ पुरुष तर ३७ महिला होत्या. आज नोंदवण्यात आलेल्या ९९ मृत्यूंपैकी ६० वर्षे किंवा त्यावरील वयाचे ४८ रुग्ण होते. तर ४९ रुग्ण हे ४० ते ५९ या वयोगटातले होते. २ रुग्ण ४० वर्षे वयाखालील होते. ज्या ९९ रुग्णांचा मृत्यू झाला त्यापैकी ६६ रुग्णांमध्ये मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग असे गंभीर स्वरुपाचे आजार होते. आजपर्यंत पाठवण्यात आलेल्या ४ लाख ३३ हजार नमुन्यांपैकी ६५ हजार १६८ पॉझिटिव्ह आले आहेत. तर इतर सगळे नमुने निगेटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ४३ शासकीय आणि ३४ खासगी अशा ७७ प्रयोगशाळा कार्यरत आहेत.

सोलापुरात करोनामुळे आठ रुग्णांचा मृत्यू

सोलापुरात आज एकाच दिवशी करोनामुळे आठ रुग्णांचा मृत्यू झाला. नव्या १४ रूग्णांची नोंद झाली. एकूण रूग्णसंख्या ८६५ तर मृतांची संख्या ८३ वर पोहोचली आहे. एकाच दिवशी करोनाबाधित आठ रुग्णांचा मृत्यू होण्याची सोलापुरातील ही पहिलीच वेळ आहे.