26 January 2021

News Flash

करोना संकटकाळात ३९ हजार २८७ बेरोजगारांना मिळाला रोजगार – नवाब मलिक

जुलैमध्ये ५८ हजार १५७ बेरोजगारांची रोजगारासाठी नोंदणी

संग्रहित

करोनाच्या संकटामुळे बेरोजगारीचीही समस्या निर्माण झाली आहे. पण असे असतानाही कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता विभागाने लॉकडाऊनच्या काळात जिल्ह्याजिल्ह्यांमध्ये आयोजित केलेले ऑनलाईन रोजगार मेळावे आणि महास्वयंम वेबपोर्टलमार्फत एकट्या जुलै महिन्यात तब्बल २१ हजार ५७२ बेरोजगारांना रोजगार मिळवून दिला आहे, तत्पुर्वी एप्रिल ते जून या तीन महिन्यांच्या काळात १७ हजार ७१५ बेरोजगारांना रोजगार मिळाला आहे, अशी माहिती कौशल्य विकास मंत्री नवाब मलिक यांनी दिली.

दरम्यान जुलै महिन्यात कौशल्य विकास विभागाच्या विविध व्यासपीठावर ५८ हजार १५७ बेरोजगारांनी रोजगारासाठी नोंदणी केली असून यांसह आधी नोंदणी केलेल्या सर्व उमेदवारांना नोकरी मिळवून देण्यासाठी विभाग प्रयत्न करीत असल्याचे त्यांनी सांगितले.

बेरोजगार उमेदवार आणि उद्योजक यांच्यामध्ये सांगड घालण्यासाठी कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता विभागाने https://rojgar.mahaswayam.gov.in हे वेबपोर्टल सुरु केले आहे. या वेबपोर्टलवर बेरोजगार उमेदवार आपले शिक्षण, कौशल्ये, अनुभव आदी माहीतींसह नोंदणी करतात. त्याचबरोबर कुशल उमेदवारांच्या शोधात असलेल्या कंपन्या, उद्योजक, कॉर्पोरेट्स हे सुद्धा या वेबपोर्टलवर नोंदणी करुन त्यांना हवे असलेले कुशल उमेदवार शोधू शकतात. अशा प्रकारे बेरोजगार आणि उद्योजक यांच्यामध्ये समन्वय घडवून आणण्याचे काम या वेबपोर्टलमार्फत करण्यात येते असे मंत्री नवाब मलिक यांनी सांगितले.

एप्रिल ते जूनअखेर या वेबपोर्टलवर १ लाख ७२ हजार १६५ इतक्या नोकरी इच्छूक उमेदवारांनी नवीन नोंदणी किंवा पुनर्नोंदणी केली आहे. तसेच फक्त जुलै महिन्यात ५८ हजार १५७ बेरोजगारांनी रोजगारासाठी नोंदणी किंवा पुनर्नोंदणी केली आहे. जुलैमध्ये मुंबई विभागात १२ हजार १५१, नाशिक विभागात ८ हजार ५२६, पुणे विभागात २२ हजार २६०, औरंगाबाद विभागात ६ हजार २७५, अमरावती विभागात ३ हजार ३६६ तर नागपूर विभागात ५ हजार ५७९ इतक्या नोकरी इच्छुक उमेदवारांनी नोंदणी किंवा पुनर्नोंदणी केली आहे. जुलैअखेर २१ हजार ५७२ उमेदवारांना नोकरी मिळविण्यात यश आले आहे. मुंबई विभागातील ३ हजार ९४०, नाशिक विभागातील १ हजार ३२१, पुणे विभागातील १४ हजार ५२१, औरंगाबाद विभागातील १ हजार १०५, अमरावती विभागातील ४१४ तर नागपूर विभागातील २७१ उमेदवार नोकरीस लागले असल्याचे मलिक यांनी सांगितले.

कौशल्य विकास विभागाने लॉकडाउनच्या काळात राज्यभरात पंडीत दीनदयाळ उपाध्याय ऑनलाईन रोजगार मेळाव्यांची मोठी मोहीम सुरु केली आहे. प्रत्येक जिल्हास्तरावर ऑनलाइन रोजगार मेळावे घेण्यात येत आहेत. एप्रिल ते जून या ३ महिन्यात २४ ऑनलाइन रोजगार मेळावे झाले तर जुलै महिन्यात ३१ मेळावे झाले. जुलैमध्ये झालेल्या मेळाव्यांमध्ये २०४ उद्योजकांनी सहभाग घेतला. त्यांच्याकडील १९ हजार ७८ जागांसाठी त्यांनी ऑनलाइन मुलाखती घेतल्या. या मेळाव्यांमध्ये १८ हजार १५३ नोकरी इच्छुक तरुणांनी सहभाग घेतला. त्यांपैकी आतापर्यंत १ हजार ६५१ तरुणांना रोजगार मिळाला आहे. उर्वरित जागांसाठी उर्वरित तरुणांमधून निवड प्रक्रिया सुरु आहे. सर्व उमेदवारांना रोजगार मिळवून देण्यासाठी विभागामार्फत प्रयत्न करण्यात येत आहेत, असेही मंत्री नवाब मलिक यांनी यावेळी सांगितले.

यापुढील काळातही रोजगार उपलब्धतेसाठी विभागामार्फत मोहीम पातळीवर काम केले जाईल. नोकरी इच्छुक तरुणांनी https://rojgar.mahaswayam.gov.in या वेबपोर्टलवर आधार क्रमांकासह नोंदणी करावी. आधी नोंदणी केलेल्या उमेदवारांनी आपली माहिती अद्यावत करावी, तसेच कुशल उमेदवारांच्या शोधात असलेले खासगी, सार्वजनिक क्षेत्रातील उद्योजक, कॉर्पोरेट्स यांनीही या वेबपोर्टलवर नोंदणी करावी असे आवाहनही मंत्री नवाब मलिक यांनी केले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 25, 2020 7:01 pm

Web Title: 39 thousand 287 unemployed got employment during the corona crisis says nawab malik aau 85
Next Stories
1 मंदिर, मशीद, बुद्धविहार यांच्यासह सर्व प्रार्थनास्थळं खुली करा; रामदास आठवलेंची मागणी
2 सप्टेंबर महिन्यात होणार विधीमंडळाचं दोन दिवसीय पावसाळी अधिवेशन
3 ई-पास सुरु राहणार की बंद करणार? ठाकरे सरकारने केलं स्पष्ट
Just Now!
X