News Flash

दानपेटीतील पैशांचा आता दररोज भरणा

देवस्थाने व धर्मादाय संस्थांना सक्ती

देवस्थाने व धर्मादाय संस्थांना सक्ती

राज्यातील सर्व देवस्थाने व धर्मादाय संस्था यांच्याकडे दररोज दान, देणगी स्वरूपात जमा होणाऱ्या चलनी नोटा आणि नाणी आता रोजच्या रोज राष्ट्रीयीकृत बँकांमधील खात्यात जमा करावे लागतील. विधी व न्याय विभागाच्या सूचनेनुसार धर्मादाय आयुक्तांनी तसा आदेशच जारी केली आहे. दरम्यान, ५०० व १००० रुपयांच्या नोटा बाद केल्यानंतर देवस्थानच्या उत्पन्नात घट झाल्याचे देवस्थानांच्या विश्वस्तांकडे चौकशी करता सांगण्यात आले. देवस्थानांच्या दानपेटीत या बाद नोटा भाविक टाकतील अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती, ती फोल ठरली आहे.

नगरमधील धर्मादाय आयुक्त कार्यालयातून मिळालेल्या माहितीनुसार जिल्हय़ात ट्रस्ट कायद्यान्वये जिल्हय़ात सुमारे २० हजार संस्था नोंदणीकृत आहेत. कायद्याच्या कलम अ अन्वये हिंदुधर्मीयांच्या ९५० तर ब अन्वये वक्फ बोर्डकडील, क अन्वये पारशी, ड अन्वये ख्रिश्चनधर्मीयांच्या आहेत, मात्र त्या तुरळक आहेत. बहुतांशी संस्था कलम फ अन्वये झालेल्या नोंदणीकृत झालेल्या या शैक्षणिक किंवा सामाजिक स्वरूपाच्या आहेत. या सर्वाना हा रोज दानपेटी उघडून भरणा करण्याचा आदेश लागू करण्यात आला आहे.

शिर्डी देवस्थानच्या नियमानुसार तेथील दानपेटी उघडताना धर्मादाय कार्यालयाचा प्रतिनिधी मोजदाद करण्यासाठी उपस्थित असतो. इतर अनेक देवस्थानमध्ये विश्वस्तच ग्रामस्थ, भाविक यांच्या उपस्थितीत पंचनामा करून मोजदाद करण्यासाठी दानपेटी उघडली जाते. अनेक देवस्थानमध्ये आठवडय़ातून एकदा, महिन्यातून एकदा दानपेटी उघडली जाते. मात्र नव्या आदेशानुसार ती आता दररोज उघडून, त्यातील भरणा बँकेत जमा करावा लागेल. त्यासाठी दररोज पंचनामाही करावा लागेल.

ट्रस्ट कायद्यानुसार नोंद झालेल्या देवस्थान धर्मादाय संस्थांना त्यांचे बँक खाते केवळ राष्ट्रीयीकृत बँकेतच असावे, असे बंधन आहे. ग्रामीण भागात अनेक ठिकाणी राष्ट्रीयीकृत बँका नाहीत. त्यामुळे अनेक देवस्थान, धर्मादाय संस्थांनी सहकारी बँक, पतसंस्थेत खाते उघडले आहेत.

शिर्डी-शनिशिंगणापूरला कॅशलेस व्यवहार!

श्रीरामपूर- ऑनलाइन दान देण्याकडे भाविकांचा कल वाढल्याने शिर्डी व शनिशिंगणापूर या देवस्थानांनी सुविधा उपलब्ध करून दिली आहे. त्यामुळे आता कॅशलेस व्यवहाराकडे लोकांचा ओढा काही प्रमाणात वाढला आहे. शिर्डीचे साईबाबा संस्थान दोनदा मंगळवार व शुक्रवार अशी आठवडय़ातून दोनदा दानपेटय़ातील दानाची मोजणी करून पैसे बँकेत जमा करत असे. पण आता दररोज दानपेटय़ा उघडल्या जात आहेत. येथील दानपेटय़ांमध्ये यापूर्वी पाचशे व हजारच्या नोटा जमा होत. पण आता दहा, वीस व शंभरच्या नोटांचे दान वाढले आहे. दोन हजारच्या नोटाही तुलनेत कमी आहेत. पूर्वी साईबाबा मंदिर परिसरातील देणगी कक्षामध्ये चार स्वाइप मशिन ठेवण्यात आले होते. त्याचा वापर कमी भाविक करत. सुमारे दोन लाख रुपयांची देणगी संस्थानला मिळत असे. पण आता चार भक्तनिवास, प्रसादालय तसेच मंदिर परिसरात स्वाइप मशिनची संख्या वाढवण्यात आली असून ती १२ करण्यात आली आहे. दररोज त्या माध्यमातून सहा लाखांपर्यंतचे दान जमा होत आहे. तसेच धनादेश व डिमांड ड्राफ्टने देणगी देण्याचे प्रमाण तिपटीने वाढले आहे. पूर्वी सरासरी २० हजार रुपयांची रक्कम जमा होत असे. पण आता ती ६५ हजारांवर गेली आहे. त्याखेरीज ऑनलाइन पद्धतीने बाहेरील साईभक्त संस्थानला देणग्या पाठवत आहेत.

देणग्या घटल्या

पाचशे व हजार रुपयांच्या नोटांवर बंदी घातल्यामुळे देवस्थानच्या दानपेटीत चिल्लर कमी होऊन या नोटा वाढतील, असे वाटत होते. मात्र तसे झाले नाही. उलट नेहमीपेक्षा दानपेटीत कमी रक्कम जमा झालेली आढळली. आम्ही दर सोमवारी दानपेटी उघडतो, त्या दिवशी गुरुनानक जयंतीची सुट्टी असल्याने आम्ही दुसऱ्या दिवशी, मंगळवारी दानपेटी नोटाबंदीनंतर प्रथमच उघडली. त्या वेळी ही बाब निदर्शनास आली   – योगेश बानकर, शनिशिंगणापूर देवस्थानचे कोषाध्यक्ष.

मढीत गुरुवारीच दानपेटी उघडली

देवस्थान यापूर्वी दर आठवडय़ाला दानपेटी ग्रामस्थ, भाविकांच्या उपस्थितीत दानपेटी उघडत असे. आता आम्हाला दररोज पंचानामा करून उघडावी लागेल. बँकांचा भरणा करण्याची वेळ दुपारी अडीचपर्यंतच असते. ती पाळण्यासाठी धावाधाव करावी लागेल. धर्मादाय आयुक्तांचा आदेश प्राप्त झाल्यावर देवस्थानने गुरुवारीच दानपेटी उघडली होती. नोटाबंदीनंतर दानपेटीत नेहमीपेक्षा कमी रक्कम जमा होत असल्याचे निदर्शनास आले आहे.  – शिवशंकर राजळे, अध्यक्ष, कानिफनाथ देवस्थान, मढी.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 18, 2016 1:02 am

Web Title: 500 and 1000 rupee notes ban impact on shrine
Next Stories
1 नोटबंदीमुळे काळू-बाळू तमाशाही अडचणीत
2 निर्णायक लढाईसाठी थोडी कळ सोसा
3 राज्यात वनहक्क दाव्यांच्या अटी शिथील?
Just Now!
X