करोना महामारीच्या पार्श्वभूमीवर आज शनिवारी टाळेबंदीच्या दुसऱ्याच दिवशी धक्कादायक माहिती समोर आली. करोनाबाधित ७० रुग्ण वाढताना, ही संख्या २,२१३ झाली. तर, ६ रुग्ण दगावल्याने करोनाबळींची संख्या ८० झाली. एकाच दिवसात सहा जणांचा करोना संसर्गाने मृत्यू होण्याची ही पहिलीच वेळ आहे.

करोना संशयित म्हणून घशाच्या स्रावांचे नमुने घेतले गेलेल्या व्यक्तींची संख्या २० हजारांवर पोहचली आहे. नव्याने ६८३ जणांची करोना चाचणी घेण्यात आली असून, आजवर चाचणी घेतलेल्या व्यक्तींची संख्या २०,६१६ झाली आहे. तर, उपचाराधीन रुग्णांची संख्या ९०८ असून, आजवर उपचारांती १,२२५ रुग्णांना प्रकृतिस्वास्थ्य लाभल्याने ते आपल्या घरी परतले आहेत.

सातारा जिल्ह्यत ठिकठिकाणी निष्पन्न झालेल्या करोनाबाधितांच्या साखळय़ा तोडण्याचे आरोग्य यंत्रणा व प्रशासनासमोर कडवे आव्हान असताना, रुग्ण निष्पन्नतेचे प्रमाण तासाला पाच असे राहिल्याने चिंतेचे वातावरण आहे. तर, सातारा जिल्ह्यतच नव्हेतर संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रात सर्वाधिक रुग्ण कराड तालुक्यात निष्पन्न आहेत. कराड तालुक्यातील करोनाबाधितांची संख्या पाचशेच्या समीप पोहचली आहे. मात्र, तुलनेत कराड शहरात करोनाचे रुग्ण निष्पन्नतेचे प्रमाण कमी राहिले आहे.