सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यातील एका सोने व्यापाऱ्याने जीएसटीला कंटाळून आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. राहुल फाळके असं या व्यापाऱ्याचं नाव असून, आत्महत्येपूर्वी फाळके यांनी फेसबूक पोस्ट लिहून नरेंद्र मोदी सरकारने लागू केलेल्या जीएसटीच्या आपल्याला व्यवसायात किती नुकसान होतय याची कहाणी सांगितलेली आहे. शुक्रवारी दुपारी साडेबारा वाजता कोपर्डे हवेली गावाच्या हद्दीत रेल्वेरुळाखाली येऊन राहुल फाळकेंनी आत्महत्या केली आहे. आपल्या मृत्यूसाठी कोणालाही जबाबदार धरु नये असं आवाहन करत फाळके यांनी आपल्या कुटूबांची काळजी घेण्याचं आवाहन केलं आहे.

मोदींनी नोटाबंदी आणि जीएसटी कायदा लागू केल्यानंतर सोने-चांदी व्यवसायाला उतरती कळा लागली आहे. आमचा धंदा उधारीवर चालतो, त्यामुळे प्रत्येकवेळी गरज असताना मी सर्वांना मदत केली. पण मला या बदल्यात केवळ विश्वासघातच मिळाला. त्यामुळे माझी चूक नसताना मी मान खाली घालून जगू शकत नाही, अशा आशयाची पोस्ट लिहीत फाळके यांनी आपलं आयुष्य संपवलेलं आहे. फाळके यांचं कराडमधील शनिवार पेठेत मारुती मंदीर चौकात मंगलमुर्ती ज्वेलर्स नावाचं दुकान आहे. राहुल आपल्या वडीलांसोबत सोन्या-चांदीचा व्यवसाय सांभाळत होते. स्थानिक लोकांनी दिलेल्या माहितीनूसार राहुल फाळके हे एक शिवसेनेचे निष्ठावंत कार्यकर्ते होते. नोटाबंदी लागू होण्याच्या आधी फाळके यांनी अनेकांना मदत केली होती, मात्र नोटाबंदीचा निर्णय लागू झाल्यानंतर अडचणीच्या काळात कोणीही त्यांच्या मदतीला धावून आलं नाही. या कारणामुळे फाळके यांना व्यवसायात मोठा फटका बसल्याचं बोललं जातंय.

फाळके हे शिवसैनिक असून आपल्या पोस्टमध्ये त्यांनी पक्षाला व शिवसैनिकांना आपल्या कुटुंबाची काळजी घेण्याचं आवाहन केलं आहे. या घटनेमुळे साताऱ्यासह संपूर्ण कराड भागावर शोककळा पसरलेली आहे. राहुल फाळके यांच्या पश्चात आई-वडील, पत्नी व ३ वर्षाचा मुलगा असा परिवार आहे.