महाराष्ट्रासह इतर काही राज्यात रेमडेसिवीर इंजेक्शनचा तुटवडा जाणवत आहे. त्यामुळे रुग्णांच्या नातेवाईकांना रेमडेसिवीर मिळवण्यासाठी अनेक समस्यांचा सामना करावा लागत असल्याचं दृश्य आहे. एकीकडे रेमडेसिवीरची मागणी प्रचंड वाढलेली असताना महाराष्ट्राच्या COVID-19 टास्क फोर्सचे सदस्य डॅा. शशांक जोशी यांचं रेमडेसीवीरबद्दलचं ट्विट करत महत्वाची माहिती दिली आहे.

डॉ. शंशाक जोशी म्हणतात, कोविड -19 मध्ये रेमेडेसिवीरचा समजूतदारीने वापर करणे आवश्यक आहे आणि त्याचा गैरवापर रोखणे देखील आवश्यक आहे.

रेमडेसिवीरच्या वापराने मृत्यूदर कमी होत नाही- डॉ राहुल पंडित

१. रेमडेसिवीर ही प्रायोगिक व संशोधनात्मक औषध आहे, ज्याचा कोविड-19च्या उपचारात वापरासाठी परवानगी दिली गेली आहे.
२. करोनामध्ये रेमडेसिवीर हे जीव वाचवणारं औषध नाही, या औषधामुळे मृत्यूदर कमी झाल्याचं अभ्यासातून दिसून आलेलं नाही.
३. रेमडेसिवीरमुळे रूग्णालयातील रूग्णाचे दिवस कमी होत असल्याचे दिसून आले आहे.
४. रेमडेसिवीर केवळ आणि केवळ रूग्णालयताच दिलं जावं.
५. रेमडेसिवीर हे मध्य आजारी व ऑक्सिजन घेत असलेल्या रूग्णाला देण्याचा सल्ला आहे. हे केवळ आजारपणातील पहिल्या ९ ते १० दिवसांमधील पाच दिवसांसाठीच दिलं जावं.
६. रेमडेसिवीर घरी दिलं गेलं नाही पाहिजे.
७. अनावश्यक व असमंजसपणे रेमडेसिवीरचा वापर करणे हे अनैतिक आहे.

रेमडेसिवीर ‘करोना’वर परिणामकारक असल्याचा कोणताही पुरावा नाही -WHO

रेमडेसिवीर करोनावर परिणामकारक असल्याचा कोणताही पुरावा नाही, असं डब्ल्यूएचओने या अगोदरच म्हटलेलं आहे.  जागतिक आरोग्य संघटनेचे मुख्य शास्त्रज्ञ डॉ. सोमया स्वामिनाथन आणि डॉ. मारिया वॅन केरखोव यांनी इंडिया टुडेला दिलेल्या मुलाखतीत ही माहिती दिली होती. अलिकडेच करण्यात आलेल्या पाच चाचण्यांमधून हेच समोर आलंय की करोनामुळे होणारे मृत्यू कमी करण्यासाठी आणि रुग्णांच्या व्हेंटिलेशनमध्ये घट करण्यात रेमडेसिवीरच्या वापरामुळे कोणतीही मदत होत नाही, असं त्यांनी म्हटलं आहे.