करोना विषाणूच्या प्रसारात होणाऱ्या वाढीच्या पार्श्वभूमीवर नागपूर विभागातील सर्व जिल्ह्यांत करोना विषाणूच्या प्रसाराचे मुल्यांकन अभ्यास करण्याचे ठरले आहे. वर्धा जिल्ह्यासाठी जिल्हा आरोग्य यंत्रणा, वर्धा यांच्या सहकार्याने महात्मा गांधी आयुर्विज्ञान संस्था, सेवाग्राम पुढील एक महिन्यादरम्यान हा अभ्यास करणार आहे. वर्धा जिल्ह्याच्या किती लोकसंख्येला करोना विषाणूची लागण झाली आहे. हे या अभ्यासातुन कळणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

एखाद्या व्यक्तीस करोना विषाणूचा संसर्ग झाल्यास, त्या व्यक्तीच्या रोगप्रतिकारक शक्तीमध्ये विषाणूविरूद्ध लढण्यासाठी रक्तपेशी विकसित होतात आणि कित्येक महिने ते वर्षांपर्यंत त्या रक्तप्रवाहात राहतात. रक्ताची तपासणी करून त्या व्यक्तीस यापूर्वी करोना विषाणूचा संसर्ग झाला होता, की नाही याचा शोध घेता येतो. विषाणूविरूद्ध लढण्यासाठी रक्तपेशी आढळलेल्या व्यक्तींमध्ये करोना विषाणूची लागण होण्याची शक्यता कमी असते. लोकसंख्येच्या सर्वेक्षणात, जास्तीत जास्त लोकांमध्ये अशा रक्तपेशी आढळत असतील, तर समुदायात करोना विषाणूच्या संक्रमाणाची शक्यता कमी असते.

सदर सर्वेक्षण सर्वसाधारण लोक, कंटेनमेंट झोन आणि अतिजोखीम गट अशा तीन गटामधून २ हजार ४०० रक्ताचे नमुने घेऊन केला जाणार आहे. वर्धा येथे होणारा हा अभ्यास, सर्वसाधारण लोक तसेच कंटेनमेंट झोन आणि अतिजोखीम गट; उदाहरणार्थ, आरोग्य सेवेतील कर्मचारी , पोलिस, भाजी विक्रेते आणि औद्योगिक कामगार यांना यापूर्वी संसर्ग झाला की नाही या बद्दल माहिती देईल.

या अभ्यासासाठी समुदायतुन लोक निवडून त्यांच्या रक्ताचे नमुने एका चमूद्वारे गोळा केले जातील. संशोधन टीम निवडलेल्या भागात घरोघरी जाऊन रक्ताचे नमुने गोळा करतील. याची चाचणी विनामूल्य असेल. निकाल सहभागींना दाखवण्यात येईल; तथापि, चाचणीमधे मागील संसर्गाची स्थिती दर्शविली जाणार असल्यामुळे पॉझिटिव्ह परिणामासाठी कोणतीही कार्यवाही किंवा उपचार दिले जाणार नाही. हा अभ्यास करण्यासाठी समाजाचा पाठिंबा असणे अत्यंत आवश्यक आहे. या अभ्यासाचे निकाल करोनाविरूद्ध प्रभावीपणे लढायला मदत करतील.
आपल्या जिल्ह्यात होत असलेला हा अभ्यास लोकांच्या आरोग्याच्या दृष्टीने महत्वाचा ठरणार आहे. यावरून जिल्ह्यातील कोरोना विषाणूच्या संक्रमाना स्थिती काय आहे? हे समजणार आहे. आरोग्य विभागाने निवडलेल्या भागातील नागरिकांनी न घाबरता ही चाचणी करून घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी विवेक भीमनवार यांनी केले आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: A study of the spread of corona virus will be conducted in all the districts of nagpur division msr
First published on: 08-08-2020 at 21:23 IST