कला, क्रीडा, शैक्षणिक, सांस्कृतिक क्षेत्रासाठी आवश्यक सुविधा आणि त्यासाठी राज्यभरातील तज्ज्ञ प्रशिक्षक अशा महत्त्वपूर्ण गोष्टी एकत्र असलेले शांतिनिकेतन लोकविद्यापीठ हे या भागातील एकमेव केंद्र आहे. येथे शिक्षण घेतलेला विद्यार्थी मन, मेंदू आणि मनगटाने सामथ्र्यवान बनून आपले कर्तव्य सिद्ध करून दाखवतोच, असे सांगून तुम्हीही इतरांपेक्षा वेगळे करायचा प्रयत्न करा. आई-वडिलांसोबत देशाचेही नाव मोठे करा, असे आवाहन शिवसेना चित्रपट सेनेचे अध्यक्ष ज्येष्ठ अभिनेते आदेश बांदेकर यांनी विद्यार्थ्यांना केले. निमित्त होते शांतिनिकेतनच्या विद्यार्थ्यांशी त्यांनी साधलेला दिलखुलास संवादाचे.

बांदेकर यांनी नवभारत शिक्षण मंडळ संचलित लेफ्ट. जन. एस. पी. पी. थोरात अ‍ॅकॅडमीच्या विद्यार्थ्यांशी संवाद साधला. आपले करीअर, त्यामध्ये शांतिनिकेतनचे योगदान, राजकारण, समाजकारण आणि क्रीडा क्षेत्राविषयी विद्यार्थ्यांनी त्यांना अनेक प्रश्न विचारले. या सर्व प्रश्नांना त्यांनी हजर जबाबीपणाने उत्तरे दिली.    स्वागत स्कूल इन्चार्ज सविता पाटील यांनी केले. प्रास्ताविक संस्थेचे संचालक गौतम पाटील यांनी केले. संस्थेच्या वतीने लवकरच स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र सुरू करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली. ललितकला व नाटय़तंत्रशिक्षण महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. रामचंद्र भर्तू, शिवसेनेचे नेते अभिजित पाटील, मििलद खिलारे आदींसह अनेक मान्यवर उपस्थित होते.