भाजप प्रवेशाची शक्यता मात्र फेटाळली

औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातून सुभाष झांबड यांना काँग्रेसची उमेदवारी दिल्यामुळे नाराज असणाऱ्या आमदार अब्दुल सत्तार यांनी शनिवारी पक्षाचा राजीनामा दिला आणि रात्री उशिरा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. मात्र ही भेट लोकसभा निवडणूक अपक्ष लढवणार असल्याचे सांगण्यासाठी होती. अन्य प्रमुख नेत्यांच्याही गाठीभेटी घेणार होतो, मात्र ते मुंबईत उपलब्ध नव्हते. मुख्यमंत्र्यांची भेट झाली असली तरी भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता सत्तार यांनी फेटाळून लावली. मुख्यमंत्र्यांनी सिल्लोड मतदारसंघासाठी निधीच्या रूपाने बरीच मदत केल्याचाही उल्लेख सत्तार यांनी आवर्जून केला. तर, सत्तार यांना औरंगाबाद व जालना मतदारसंघातून अजूनही पक्ष उमेदवारी देण्यास तयार आहे, असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना सांगितले.

जालना लोकसभा मतदारसंघात शिवसेनेच्या अर्जुन खोतकर यांनी काँग्रेसमध्ये यावे आणि भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या विरोधात निवडणूक लढवावी यासाठी सत्तार यांनी प्रयत्न केले होते. मुख्यमंत्र्यांनी खोतकर आणि दानवेंमध्ये दिलजमाई घडवून आणली. त्यामुळे अब्दुल सत्तार यांच्या प्रयत्नांवर पाणी फिरले.

जालन्यामध्ये आता डाळ शिजत नाही असे लक्षात आल्यानंतर सत्तार यांनी औरंगाबादमधील उमेदवारीचा मुद्दा पुढे केला आणि काँग्रेसवर नाराज असल्याचे सांगत पक्षाचा राजीनामा दिल्याचे शनिवारी पत्रकारांना सांगितले. बंडाचे निशाण फडकवत सत्तार यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्यामुळे ते भाजपत जाणार का अशी चर्चा सुरू झाली. मात्र, अपक्ष निवडणूक लढविणार आहे, भाजपत जाणार नाही असे सत्तार यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना स्पष्ट केले.

‘सत्तार यांनीच नकार दिला’

औरंगाबाद किंवा जालना या दोन्ही लोकसभा मतदारसंघातून आमदार अब्दुल सत्तार यांना उमेदवारी देण्यास काँग्रेस पक्ष तयार होता. तेव्हा त्यांनी सांगितले, ‘‘मला लोकसभा निवडणुकीत उतरायचे नाही.’’ आता त्यांना अचानक निवडणूक लढविण्याची इच्छा झाली आहे. आणि दोन्ही मतदारसंघापैकी जेथून त्यांना उमेदवारी हवी असेल तेथून काँग्रेस पक्ष तिकीट देईल. तशा सूचना पक्षाकडून जाहीर करण्यात आलेले उमेदवार सुभाष झांबड आणि विलास औताडे यांना दिल्या आहेत. त्यांना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला आहे. आता ते प्रतिसाद देत नाहीत, असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना सांगितले.