कोल्हापूरमधील जिल्हा परिषदेतील एका वरिष्ठ सहाय्यकाला भ्रष्टाचाराच्या आरोपावरुन भ्रष्टाचार विरोधी पथकाने अटक केली आहे. या अधिकाऱ्याला ३५ हजार रुपयांची लाच घेतल्याच्या आरोपावरुन अटक करण्यात आली. चंद्रकांत सावर्डेकर असे या अधिकाऱ्याचे नाव आहे. विशेष म्हणजे सावर्डेकर यांनी लाच म्हणून स्विकारलेल्या रकमेत दोन हजाराच्या नव्या नोटांचा समावेश आहे.

चंद्रकांत सावर्डेकर यांना जिल्हा परिषदेच्या शाळेतील शिक्षकाकडून लाच घेताना अटक करण्यात आली. ‘चंद्रकांत सावर्डेकर आपल्याला मुख्याध्यापकपदी बढती मिळण्यापासून रोखले. बढतीसाठी सावर्डेकरांकडून पैशांची मागणी करण्यात आली होती,’ तक्रार शिक्षकाकडून करण्यात आल्याची माहिती भ्रष्टाचार विरोधी पथकाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.

चंद्रकांत यांनी तक्रारदार शिक्षकाकडून सुरुवातीला ४० हजारांची मागणी केली होती. मात्र याला शिक्षकाने असमर्थता दर्शवली. त्यामुळे मग चंद्रकांत सावर्डेकर यांनी ३५ हजार रुपयांची मागणी केली. सावर्डेकर यांनी लाच म्हणून स्वीकारलेल्या रकमेमध्ये २ हजार रुपयांच्या १७ नोटांचा समावेश आहे. या प्रकरणाची माहिती मिळताच भ्रष्टाचार विरोधी पथकाने सापळा रचला आणि सावर्डेकरांना लाच स्वीकारताना रंगेहाथ अटक केली.

काळा पैसा आणि भ्रष्टाचार रोखता यावा, म्हणून पाचशे आणि हजाराच्या नोट रद्द करण्यात आल्याचा निर्णय मोदी सरकारकडून घेण्यात आला. मोदींनी या निर्णयाची घोषणा करताना दोन हजार रुपयांच्या नव्या नोटा आणण्याचीदेखील घोषणा केली होती. त्यावेळीच दोन हजार रुपयांच्या नोटेबद्दल अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले होते. दोन हजारांच्या नोटेमुळे काळा पैसा साठवणे आणि भ्रष्टाचार करणे सोपे होईल, असे म्हटले जाते. कोल्हापूरमधील लाच प्रकरणामुळे दोन हजार रुपयाच्या नोटेचा दुरुपयोग पहिल्यांदाच समोर आला आहे.