बीड जिल्हा वार्षिक विकास योजनेतून करोना विषाणूच्या प्रतिबंधात्मक उपाययोजनांसाठी जिल्हा उपजिल्हा आणि स्वाराती रुग्णालयासह ग्रामीण रुग्णालयांमध्ये आयसोलेशन वॉर्ड, यंत्रसामग्री, व्हेंटिलेटर्स, औषधसाठा आदी उपाययोजनांसाठी ११ कोटी ८ लाख रुपये निधीस प्रशासकीय मान्यता देण्यात आली.  संबंधित यंत्रणेस निधी वितरित करण्यात आला असून करोनाचा मुकाबला करण्यासाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज करण्यात आली आहे, असा विश्वास पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी दिला आहे.

बीड जिल्ह्यात करोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने सुरुवातीपासूनच खबरदारी घेतली आहे. परिणामी 1 एप्रिल पर्यंत जिल्ह्यात एकही करोना बाधित रुग्ण आढळला नाही. मात्र पुणे मुंबई, पुणे, औरंगाबादसह अनेक जिल्ह्यात व इतर राज्यात कामासाठी गेलेले नागरिक लाखोच्या संख्येने परतलेले आहेत. त्यामुळे आगामी काळात करोनाची बाधा झालेले रुग्ण आले किंवा आढळले तर उद्भवणाऱ्या परिस्थितीस तोंड देण्यासाठी आरोग्य यंत्रणा सज्ज करण्यात आली आहे.

जिल्हा रुग्णालयासह अंबेजोगाई येथील स्वाराती रुग्णालयात आयसोलेशन वॉर्ड, व्हेंटिलेटर्स, औषध साठा, पीपीई कीट, करोना चाचणी कीट यासह विविध सामग्रीसाठी निधी देण्यात आला आहे. तसेच, अंतर्गत उपजिल्हा रुग्णालयात औषधी, यंत्रसामग्री, १० व्हेंटिलेटर्स, एन-९५ मास्क, करोना कीट, पीपीई कीट आदी सामग्रीसाठीही निधी राखीव ठेवण्यात आला आहे.

उपजिल्हा रुग्णालयांतर्गत विलगिकरण कक्ष स्थापन करणे, प्रतिबंधात्मक उपाययोजना, १ लाख ट्रिपल लेयर मास्क, ऑक्सिजन सिलेंडर, व्हेंटिलेटर्स यांसह विविध साधनसामग्रीसाठी पूरेसा निधी देण्यात आलेला असल्याचे सांगण्यात आले आहे. स्वाराती रुग्णालयात १० अडल्ट व्हेंटिलेटर्स, आवारात आयसोलेशन वॉर्ड व विद्युतीकरण करण्यात येणार आहे. तसेच उपजिल्हा रुग्णालयात आरओ,  व्हील चेअर्स,  व्हॅक्यूम क्लिनर्स, ब्लड कलेक्शन व्हॅन,  ट्रान्सपोर्ट व्हॅन,  पीपीई कीट,  सुरक्षा कीट आदी साधनसामग्रीची खरेदी होणार आहे. बीड जिल्हा वार्षिक योजनेतून कोरोना संदर्भात आतापर्यंत निधी व मनुष्यबळ असा दुहेरी सामना युद्धपातळीवर सुरू असून,  आवश्यक प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यासाठी निधीची कमतरता पडू देणार नाही, असे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी सांगितले आहे.