‘भारताने पाकिस्तानची आर्थिक कोंडी करावी’

अकोला : निवडणुकीत पाडापाडी करण्यासाठीच भाजप व शिवसेनेची युती झाली असल्याचे मत वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख व भारिप-बमसंचे अध्यक्ष अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केले. पुलवामा दहशतवादी हल्ल्याच्या पाश्र्वभूमीवर भारताने पाकिस्तानची आर्थिक कोंडी करण्यासाठी पुढाकार घ्यावा, असा सल्लाही त्यांनी दिला.

अकोल्यात पक्षाच्या कार्यालयात मंगळवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी प्रा. अंजली आंबेडकर, पश्चिम शहराध्यक्ष सीमांत तायडे व वंदना वासनिक आदी उपस्थित होते. अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी विविध मुद्यांवर भाष्य केले. पुढे बोलताना ते म्हणाले, ‘आगामी निवडणुकांमध्ये पाडापाडी करण्यासाठीच भाजप-शिवसेना एकत्र आले आहेत. राज्यात ज्यांच्या जागा जास्त निवडून येतील, त्यांचा मुख्यमंत्री होईल असे सूत्र त्यांच्यात ठरले असावे. त्यामुळे पाडण्याचे धोरण त्यांच्याकडून राबवण्यात येईल. हिंदुत्वाच्या मुद्यावर आम्ही एकत्र आलो, असे ते सांगत असले तरी ते खोटे असून, मतदारांवर कुठलाही शिक्का नसतो.’

पुलवामा दहशतवादी हल्ल्यावर भाष्य करताना अ‍ॅड. आंबेडकर म्हणाले, भारतासह अमेरिकेच्या कठोर भूमिकेमुळे पाकिस्तान सध्या दिवाळखोरीच्या वाटेवर आहे. सौदी अरेबियाने पाकिस्तानला दिलेली आर्थिक मदत रोखण्यासाठी भारताने हस्तक्षेप करायला पाहिजे होते. पाकिस्तानच्या संपूर्ण आर्थिक कोंडीसाठी भारताने आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रयत्न करणे गरजेचे आहे. हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारताने पाकिस्तानविरुद्ध युद्ध किंवा ‘सर्जिकल स्ट्राईक’ करण्यापूर्वी त्याचे आंतरराष्ट्रीय परिणाम काय होतील, याचा विचार केला पाहिजे, असेही ते म्हणाले. पंतप्रधानांनी दहशतवादी हल्ल्यासंदर्भात गुप्तचर यंत्रणेकडून प्राप्त गोपनीय माहिती प्रमुख विरोधी पक्षाच्या अध्यक्षांना देऊन त्यांना विश्वासात घ्यावे, असे मतही त्यांनी व्यक्त केले.

पुलवामा दहशतवादी हल्ल्यात केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) जवानांचा मृत्यू झाला. लष्करी व निमलष्करी असा भेद असून, सीआरपीएफ हे निमलष्करी दलामध्ये येते. त्यामुळे सरकार त्यांना शहीद म्हणून संबोधित असले तरी त्यांच्या कुटुंबीयांना शहिदांच्या सुविधेपासून वंचित राहावे लागू शकते. त्यामुळे सीआरपीएफच्या जवानांच्या कुटुंबीयांना शहिदांच्या सर्व सुविधांचा लाभ देण्याची मागणी त्यांनी केली. यासाठी पाठपुरावा करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. निमलष्करी दलासाठी कल्याण मंडळ नसल्याने लष्करी कल्याण मंडळाकडेच यांचीही जबाबदारी द्यावी, असेही ते म्हणाले. यावेळी शिवजयंतीच्या रॅलीचा खर्च कमी करून शहिदांच्या कुटुंबासाठी २५ हजारांचा निधी देण्यात आला.

अकोल्यात ऐनवेळी उमेदवार

राज्यात विविध मतदारसंघात वंचित बहुजन आघाडी उमेदवार जाहीर करत आहे. अकोला मतदारसंघाच्या उमेदवाराबाबत विचारले असता, अकोल्यात ऐनवेळी उमेदवार जाहीर करू, असे अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले. काँग्रेससोबतच्या आघाडीसंदर्भात २३ फेब्रुवारीला भूमिका जाहीर करू, असेही ते म्हणाले.