मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या आजच्या नगर दौऱ्यात त्यांची व पत्रकारांची भेट टाळण्याचा आटोकाट प्रयत्न जिल्हा प्रशासनाने अखेरच्या क्षणापर्यंत केला. जिल्ह्य़ातील टंचाई निवारण्याच्या कामातील पाथर्डी, कर्जत येथील घोटाळे पत्रकारांच्या माध्यमातून राज्यभर गाजत असल्यामुळे  की काय जिल्हा प्रशासन सुरूवातीपासून पत्रकारांना लांबच ठेवण्याच्या प्रयत्नात होते. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या रस्त्यावरच्या प्रवेशद्वारापासूनच ही अडवणूक सुरू होती. पत्रकारांना आत जाऊ दिले जात नव्हते. ‘जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश आहे’ असे पोलीस अधिकारी सांगत होते. त्यामुळे काहींनी त्यांच्याबरोबर मोबाईलवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. ते उपलब्ध झाले नाहीत म्हणून निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांबरोबर संपर्क साधण्यात आला. त्यांनीही ‘जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश आहे’ असेच सांगितले. खुद्द जिल्हाधिकाऱ्यांनी ‘मुख्यमंत्री कार्यालयाचाच आदेश आहे’ असे सांगत हात वर केले. त्यानंतर काही पत्रकारांनी पालकमंत्री पाचपुते यांना मोबाईल केला व जिल्हा प्रशासन पत्रकारांबरोबर चुकीचे वागत असल्याची तक्रार करत ‘आम्ही आता निदर्शने सुरू करतो’ असे सांगितले. पाचपुते यांनी ‘मी मुख्यमंत्र्यांबरोबर बोलतो’ असे सांगून ‘थोडा वेळ थांबा’ अशी विनंती पत्रकारांना केली.