अहमदनगरमधील पोलीस अधीक्षक कार्यालयात तोडफोड केल्याप्रकरणी पोलिसांनी २२ जणांना अटक केली. आरोपींना १० एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली असून दोन शिवसैनिकांच्या हत्येप्रकरणी अटकेत असलेले आमदार संग्राम जगताप यांना १२ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

अहमदनगरमधील केडगाव येथे शनिवारी संध्याकाळी दोन शिवसैनिकांची हत्या करण्यात आली. या प्रकरणात पोलिसांनी आमदार संग्राम जगताप यांना ताब्यात घेताच त्यांच्या समर्थकांनी पोलीस अधीक्षक कार्यालयात धडक देत अक्षरश: धुडगूस घालून तोडफोड केली. या प्रकरणी पोलिसांनी स्वतंत्र गुन्हा दाखल केला. माजी आमदार दादा कळमकर, माजी महापौर अभिषेक कळमकर, नगरसेवक कैलास गिरवले यांच्यासह २५० जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. यातील २२ जणांना पोलिसांनी अटक केली. या सर्वांना न्यायालयाने १० एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.

संग्राम जगताप समर्थकांनी पोलीस अधीक्षक कार्यालयावर दगडफेक करुन कार्यालयात तोडफोड केली. बंदोबस्तासाठी असलेले पोलीस अधिकारी, कर्मचारी व महिला पोलीस कर्मचारी यांना देखील शिवीगाळ व धक्काबुक्की करण्यापर्यंत त्यांनी मजल गाठली.

संजय कोतकर व वसंत ठुबे यांच्या हत्येप्रकरणी आमदार संग्राम जगताप यांच्यासह बाळासाहेब एकनाथ कोटकर, संदीप गुंजाळ, भानुदास कोतकर उर्फ बीएम यांना अटक केली आहे. त्यांना न्यायालयाने १२ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.