|| अशोक तुपे

काँग्रेस व राष्ट्रवादीतील नगरच्या जागेवरील तिढा सुटला असून ही जागा राष्ट्रवादीकडेच कायम राहिल तसेच विखे-पाटील यांच्या पुत्राच्या उमेदवारीबाबत तोडगा काढला जाईल, असे स्पष्ट संकेत अजित पवार यांनी दिले असतानाच लगेचच दुसऱ्या दिवशी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांचे चिरंजीव डॉ. सुजय विखे यांनी नगर लोकसभा मतदारसंघातून अपक्ष म्हणून निवडणूक लढविण्याचे जाहीर केले. एवढेच नव्हे तर प्रचारही सुरू केला आहे. या साऱ्या राजकीय घडामोडींमुळे विखे-पाटील हे बंडाची भूमिका घेतील, अशी चिन्हे आहेत.

अहमदनगर लोकसभा मतदारसंघ हा काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीत कळीचा मुद्दा ठरला आहे. ही जागा राष्ट्रवादीकडे असली तरी काँग्रेसने विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांचे पुत्र सुजय यांच्यासाठी या जागेवर दावा केला आहे. आघाडीच्या जागावाटपाच्या चर्चेत हा मतदारसंघ अद्यापही अनिर्णित असल्याचा दावा काँग्रेसकडून करण्यात येत असला तरी अजित पवार यांनी हा मतदारसंघ राष्ट्रवादीकडेच कायम राहील, अशी ग्वाही दिली. यातून वादाला तोंड फुटले आहे.

राष्ट्रवादीची परिवर्तनयात्रा नुकतीच नगर जिल्ह्य़ात आली. नगरची जागा काँग्रेसला सोडणार नाही हा संदेश राष्ट्रवादीने दिला तसेच प्रचाराची तयारीही केली.

माजी खासदार स्वर्गीय बाळासाहेब विखे व राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्यात राजकीय वैर होते. पुढे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांनी हे वैर कमी करण्याचा प्रयत्न केला. पण स्थानिक राजकारणातून ते कमी झाले नाही. आता माजी खासदार विखे यांचे नातू डॉ. सुजय हे राजकारणात सक्रिय झाले आहेत. त्यांची राजकीय शैली ही खासदार विखे यांच्यासारखी आहे. त्याचा धसका काँग्रेस व राष्ट्रवादीच्या नेत्यांनी घेतला आहे. त्यातून नगरची जागा राष्ट्रवादीकडे ठेवावी असे डावपेच खेळले गेले. काँग्रेसचे नेते व माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांचे विखे यांच्याशी पक्षांतर्गत संघर्ष असतो. थोरात यांचा डॉ. विखे यांना छुपा विरोध आहे. थोरात यांची पवार यांच्याशी जवळीक आहे. विखे यांनी बंड केले तरी थोरात हे आघाडीला मदत करणार हे नक्की आहे.

नगरमध्ये राष्ट्रवादीचे दोन आमदार आहेत. शिर्डीत राष्ट्रवादीचे एकच आमदार आहेत. तर दोन काँग्रेसचे आहेत. त्यामुळे शिर्डी काँग्रेसकडे ठेवा, असे जागावाटपात राष्ट्रवादीने सुचविले. राष्ट्रवादीने डॉ. विखे यांना राष्ट्रवादीच्या चिन्हावर निवडणूक लढविण्याचा प्रस्ताव दिला पण तो स्वीकारणे विखे यांना शक्य नाही. विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे हे काँग्रेसचे मुख्यमंत्रिपदाचे प्रबळ दावेदार आहेत. त्यांची कोंडी राष्ट्रवादी करीत आहे.

नगर मतदारसंघात राष्ट्रवादीच्या उमेदवारांचा सलग तीनदा पराभव झाला. सक्षम उमेदवार नाही. या मतदारसंघात नेहमी काँग्रेसविरोधी वातावरण असते. जातीय समीकरणे अनकूल नाहीत. माजी कुलगुरू डॉ. सर्जेराव निमसे, नरेंद्र घुले, दादा कळमकर, प्रताप ढाकणे यांची नावे आहेत. पण त्यांना मर्यादा आहेत. संपर्क कमी आहे.

डॉ. निमसे हे राजकारणात नव्हते. ते कुलगुरू पदावरून निवृत्त झाल्यानंतर विखे यांच्या प्रवरा शिक्षण संस्थेचे संचालक झाले होते. नुकताच त्यांनी राजीनामा दिला. त्यात राष्ट्रवादीचे आमदार राहुल जगताप व माजी आमदार पांडुरंग अभंग यांनी डॉ. विखे यांच्याकरिता जागा सोडावी, असे जाहीर वक्तव्य केले पण त्यांना दस्तुरखुद्द शरद पवार यांनीच गप्प केले. त्यात नगर महापालिका महापौर निवडणुकीत आमदार संग्राम जगताप व आमदार अरुण जगताप या पितापुत्रांनी भाजपला मदत केली. त्यामुळे दोघांवर पवारांचा राग आहे. परिवर्तन यात्रेपासून दोघांना दूर ठेवण्यात आले.

..त्यामुळे वाद?

अहमदनगर लोकसभा मतदारसंघ हा काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीत कळीचा मुद्दा ठरला आहे. ही जागा राष्ट्रवादीकडे असली तरी काँग्रेसने विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांचे पुत्र सुजय यांच्यासाठी या जागेवर दावा केला आहे. आघाडीच्या जागावाटपाच्या चर्चेत हा मतदारसंघ अद्यापही अनिर्णित असल्याचा दावा काँग्रेसकडून करण्यात येत असला तरी अजित पवार यांनी हा मतदारसंघ राष्ट्रवादीकडेच कायम राहील, अशी ग्वाही दिली. यातून वादाला तोंड फुटले आहे.