|| शफी पठाण

आज तिसरा दिवस आहे. संमेलनाच्या मांडवात निनादणारे निषेधाचे स्वर अजिबात क्षीण झालेले नाहीत. सत्र कोणतेही असो प्रत्येक दुसरा वक्ता, कवी बोलायला उभा झाला की आधी नयनतारा सहगल यांचे निमंत्रण रद्द करण्याची कृती निषेधार्ह ठरवतो व नंतरच मूळ विषयाकडे वळतो. हे संमेलन अभिव्यक्तीचे सर्वात सक्षम माध्यम समजले जात असताना या माध्यमाच्याच गळ्याला नख लावण्याचे काम आयोजकांनी का केले असावे, हा प्रश्न या कवी-लेखकांच्या संतापात भर घालतो आहे. शनिवारी गदिमायनच्या कलावंतांनी काळ्या फिती लावूनच मंचावर प्रवेश केला. बहिष्कारामुळे दोन सत्रे चक्क रद्द करावी लागली. तिसऱ्या सत्राला कसा तरी एक वक्ता लाभला. आज रविवारची पहाटही निषेधाच्या किरणांसह उगवली. आजच्या पहिल्याच सत्रातील कविसंमेलनात कवी प्रवीण दवणे यांनी नयनतारांना डोळ्यापुढे ठेवून अभिव्यक्तीच्या सभोवताली उभारण्यात येणाऱ्या काटेरी भिंतींवर कठोर शब्दात प्रहार केला. दवणेंच्या काही समपथिकांनी तर सहगल यांना बोलू देणार नसाल तर आम्ही तरी का बोलावे, असा प्रश्न विचारत थेट या सत्रावरच बहिष्कार टाकला होता. संमेलनाची दुपारही याच रंगात रंगली होती. ‘प्रतिभावंतांच्या सहवासात’ या कार्यक्रमावर अधिकृत बहिष्कार जाहीर केला नसला तरी निमंत्रण रद्द केल्यामुळे संमेलनाची जी बदनामी झाली ती लक्षात घेऊन डॉ. विजय भटकर, माधव गाडगीळ, चंद्रकांत कुळकर्णी या ‘प्रतिभावंतानी’ संमेलनाचा ‘सहवास’ नाकारला. या कार्यक्रमाचे समन्वयक एबीपी माझाचे संपादक राजीव खांडेकर यांनी तर वाहिनीवरूनच बहिष्काराची भूमिका जाहीर केल्यामुळे त्यांच्या येण्याचा प्रश्नच नव्हता. निषेधाचा हा स्वर किती तीव्र आहे हे तेव्हा जाणवले जेव्हा बहिष्कारामुळे डॉ. प्रभा गणोरकरांची प्रकट मुलाखतही रद्द करावी लागली. सलग तीन दिवस अखंड सुरू असलेल्या कवी कट्टय़ावरही ‘सहगलछाया’ स्पष्ट जाणवत आहे.

या कट्टय़ावर सादर होणाऱ्या बहुतेक कविता नवोदितांच्या आहेत. ते नवोदित असले तरी त्यांच्या सामाजिक जाणिवा खूप प्रगल्भ आहेत. म्हणूनच त्यांना नयनतारांच्या रूपात अभिव्यक्ती स्वातंत्र्याची झालेली हत्या रुचलेली नाही. हे असेच सुरू राहिले तर हा संताप उद्या विद्रोहातही परावर्तित होऊ  शकतो. त्याचेच संकेत या नवोदितांच्या कविता देत आहेत. अर्थात कविकट्टा हा प्रस्थापितांच्या दृष्टीने उपेक्षित मंच असल्याने त्याकडे ना संमेलनाचे लक्ष आहे, ना माध्यमांचे. पण, या कट्टय़ावरील कवितांमधून एक विशिष्ट भूमिका आकार घेत आहे. ती थेट नयनतारांच्या वैचारिक जातकुळीशी नाते सांगणारी आहे. ही झाली संमेलनात प्रत्यक्ष सहभागी झालेल्या कवी-लेखकांची गोष्ट.

श्रोता म्हणून या संमेलनात येणाऱ्या बहुतांश श्रोत्यांच्या चर्चेतूनही हा निषेध प्रतिबिंबित होत आहे. एरवी अशा संमेलनाचे आकर्षण नसलेल्या, पण सहगल आल्या नाहीत त्याचे पडसाद संमेलनावर कसे उमटताहेत हे पाहायला येणाऱ्यांची संख्याही मोठी आहे.

सारांश..संमेलन संपायला आले तरी निषेधाचे हे काव्य यवतमाळच्या आसमंतात निनादतच आहे. साहित्य संमेलनाचा इतिहास जेव्हा केव्हा लिहिला जाईल, त्यात यवतमाळच्या ९२व्या साहित्य संमेलनाचा काळा अध्याय टाळता येणार नाही, हेच जणू हे निषेधाचे काव्य आक्रंदून सांगत आहे.