जिल्हा परिषद शाळांनाही इंटरनेट कनेक्टीव्हिटी मिळणार

कोकणातील रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या तिन्ही जिल्ह्य़ातील सर्व ग्रामपंचायती आणि जिल्हापरीषद शाळांना वाय-फाय इंटरनेट सुविधा लवकरच उपलब्ध करुन दिली जाणार आहे. येत्या ८ ऑगस्टला दिल्ली येथे यांसदर्भात सर्व प्रमुख अधिकाऱ्यांची बठक बोलवण्यात आली असल्याची माहिती केंद्रीय अवजड उद्योगमंत्री अनंत गीते यांनी दिली आहे. ते अलिबाग येथे जिल्हा विकास समन्वय व सनियंत्रण समिती अर्थात दिशा समितीच्या त्रमासिक आढावा बठकीनंतर पत्रकारांशी बोलत होते. अतिरीक्त जिल्हाधिकारी पी.डी. मलिकनेर, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अविनाश गोटे निवासी जिल्हाधीकारी किरण पाणपुडे, नियोजन अधिकारी सुनील जाधव यांच्यासह सर्व विभागांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.

रायगड जिल्ह्य़ात बीएसएनएलच्या माध्यमातून ७०० ग्रामंपचायतीमध्ये पाईप टाकण्याचे काम पुर्ण झाले आहे. यातील ४०५ ग्रामपंचायतीमध्ये ऑप्टीकल केबल वायर टाकण्यात आले आहे. जिल्ह्य़ातील १३८ ग्रामपंचायती ऑप्टीकल इंटरनेट सुविधांनी जोडण्यात आल्या आहेत. यात प्रामुख्याने श्रीवर्धन, म्हसळा, खालापुर आणि मुरुड तालुक्यांचा समावेश आहे. उर्वरीत ग्रामपंचायतीमध्ये ऑप्टीकल केबल टाकण्याचे काम दोन महिन्यांत पूर्ण केले जाणार आहे. याच धर्तीवर रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्य़ातील सर्व ग्रामपंचायती आणि शासकीय शाळा वाय-फाय इंटरनेट सुविधा आणि ऑप्टिकल केबल नेटवर्कने जोडण्यात येणार आहे. यांसदर्भात दिल्ली येथे पुढील महिन्यात बठक बोलवण्यात आली असल्याचेही गीते यांनी स्पष्ट केले.

केंद्र  सरकारच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांचा त्यांनी या बठकीत आढावा घेतला. पंतप्रधान ग्राम सडक योजना टप्पा दोन अंतर्गत जिल्ह्य़ात गेल्यावर्षी ९ कामे मंजुर करण्यात आली होती. यापकी आठ कामे पुर्ण झाली असून उर्वरीत एक काम पावसाळ्यानंतर पूर्ण केले जाणार आहे. या योजनेअंतर्गत देशभरात यावर्षी पन्नास हजार किलोमीटर लांबीच्या रस्त्यांची काम करण्याचे उद्दीष्ट केंद्र सरकारने ठेवले आहे. यात राज्यातील ५ हजार किलोमिटर रस्त्यांचा समावेश आहे. त्यामुळे नवीन कामांचे प्रस्ताव आणि आराखडे तयार करण्याच्या सुचना जिल्हा प्रशासनाला देण्यात आले आहे.

दिनदयाल उपाध्याय ग्रामज्योती योजने अंतर्गत जिल्ह्य़ात १२९ कोटींची काम सुरू करण्यात आली असून आता जिल्ह्य़ातील एकही वाडी आणि गाव वीजपुरवठय़ापासून वंचीत राहिलेले नाही. अशी माहिती त्यांनी बठकीनंतर दिली. अनियमित पावसामुळे होणारे

भात शेतीचे नुकसान टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी कृषी पिक विमा योजनेचा लाभ घ्यावा. असे आवाहन त्यांनी यावेळी केले. शेतातील बांधबंदिस्तीची कामांचा आता मनरेगा योजनेत समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना आपल्याच शेतात केलेल्या कामाचा मोबदला मिळणे शक्य होणार आहे. त्याचाही शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा. असे त्यांनी स्पष्ट केले.

रस्त्यावरील खड्डे १५ ऑगस्टपूर्वी बुजवा

गणेशोत्सवाच्या पाश्र्वभुमीवर जिल्ह्य़ातील सर्व प्रमुख मार्गावरील तसेच मुंबई -गोवा महामार्गावरील खड्डे १५ ऑगस्टपूर्वी बुजवा. असे निर्देश त्यांनी सार्वजनिक बांधकाम विभाग आणि महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना दिल्या. टेंडर प्रोसेसची प्रक्रिया १ ऑगस्टपर्यंत पूर्ण होईल. ७ ऑगस्टपूर्वी प्रत्यक्ष कामांना सुरूवात होईल आणि १५ ऑगस्टपूर्वी सर्व खड्डे भरण्याची कामे पूर्ण होतील. याप्रमाणे नियोजन करण्याच्या सुचना त्यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना केल्या.