मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरशी केल्यानंतर बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौत आणि महाविकास आघाडी सरकार यांच्यात चांगलीच जुंपली आहे. दिवसभरात शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या नेत्यांनी कंगनावर धारदार शब्दांत टीका केली आहे. मुंबई ही मराठी माणसाचीच आहे…कंगनाला मुंबईत असुरक्षित वाटत असेल तर तिने इथे राहू नये अशा प्रकारची वक्तव्य महाविकास आघाडी सरकारच्या नेत्यांकडून येत आहेत. मुंबईच्या दिंडोशी भागात शिवसेना महिला कार्यकर्त्यांनी कंगना रणौतच्या पुतळ्याला चपलांनी चोप देत आपला निषेध व्यक्त केला.

अवश्य पाहा – कंगनाविरोधात शिवसेनेचे जोडे मारो आंदोलन…

राज्यात सुरु असलेल्या या सुंदोपसुंदीवर विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. आपल्याला एखाद्याचं म्हणणं पटू शकत नाही, पण लोकशाहीत व्यक्त होण्याचा आणि आपलं मत मांडण्याचा अधिकार सर्वांना आहे. वाद-प्रतिवाद होत रहावेत, पण पोस्टरला चपलांनी मारण हे पातळी घसरल्याचं लक्षण असल्याचं अमृता फडणवीसांनी म्हटलं आहे.

दरम्यान, कंगनानेही महाविकास आघाडीतील नेत्यांना सडेतोड प्रत्युत्तर देत मी मुंबईत येणार आहे, कोणामध्ये हिंमत असेल त्यांनी मला अडवून दाखवावं असं आव्हान दिलं आहे. दरम्यान रिपाइ नेते रामदास आठवले यांनी कंगनाला आपला पाठींबा दिला असून RPI कंगनाला संरक्षण देईल असं म्हटलं आहे.

अवश्य वाचा – कंगनाला RPI संरक्षण देईल, शिवसेनेनं धमकी देणं योग्य नाही – रामदास आठवले