पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यातल्या गडचिंचले येथे जमावाकडून तीन साधूंची जमावानं हत्या केली होती. या घटनेनंतर राज्यात व देशातून संतप्त प्रतिक्रिया उमटल्या होत्या. तसेच शंभराहुन अधिक आरोपींना या प्रकरणी अटक कऱण्यात आली होती. या घटनेचा तपास राज्य सरकारनं सीआयडीकडे दिला होता. सीआयडीनं या प्रकरणी न्यायालयात आरोपपत्र दाखल केलं असून, घटनेमागील कारणाचा उलगडाही झाला आहे. राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी याविषयी माहिती दिली आहे.

डहाणू तालुक्यातील गडचिंचले येथे झालेल्या घटनेप्रकरणी सीआयडीनं न्यायालयात आरोपपत्र दाखल केलं. पोलीस उपअधीक्षक आणि तपास अधिकारी विजय पवार यांनी डहाणू येथील न्यायालयात १२६ आरोपींविरोधात ४९५५ पानांचं आरोपपत्र दाखल केलं. सीआयडीनं आरोपपत्र दाखल केल्यानंतर राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी याविषयी अधिक माहिती दिली.

“तीन महिन्यांपूर्वी पालघरला झालेल्या हल्ल्यात २ साधू आणि १ ड्रायव्हर अशा तीन जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. याप्रकरणाचा सर्व तपास सीआयडीकडे देण्यात आला होता. त्यानुसार त्यांनी न्यायालयात आरोपपत्र दाखल केलं आहे. सदर घटना फक्त अफवेतून घडली असल्याचे सीआयडीच्या तपासातून निष्पन्न झाले. त्यावेळी अनेक राजकीय पक्षांनी या घटनेला जातीय रंग देण्याचा प्रयत्न केला होता. पण सीआयडीच्या तपासातून ही घटना केवळ अफवेतून घडली असल्याचं स्पष्ट झालं आहे. सीआयडीनं या प्रकरणात ८०८ लोकांची सखोल चौकशी करून १५४ जणांना अटक केली आहे. तसेच पुढील कार्यवाही न्यायालयात चालेलं,” असं अनिल देशमुख म्हणाले.

१६ एप्रिलच्या रात्री सुरतकडे निघालेल्या दोन साधूंसह चालकाची गडचिंचले येथे जमावाकडून अत्यंत निर्घृणपणे हत्या करण्यात आली होती. याप्रकरणी पोलिसांनी १५४ जणांना अटक केली होती. यात ११ अल्पवयीन आरोपींना ताब्यात घेण्यात आलं होतं. तसंच पाच पोलिसांनाही या घटनेनंतर निलंबित करण्यात आलं होतं, तर ३० हून अधिक बदल्या करण्यात आल्या होत्या.