महापालिकेने मालमत्ता कर व नळपट्टी भरण्यासाठी ऑनलाईन सुविधा उपलब्ध करून देताना या पद्धतीने लोकांनी कर भरावा, या साठी करात एक टक्का सवलतही दिली; परंतु खरेदीवर ऑनलाईन जोर देणाऱ्या नांदेडकरांनी कर ऑनलाईन भरण्याबाबत मात्र उदासीनता दाखवली आहे. शहरात सुमारे एक लाख मालमत्ताधारक असताना फक्त गेल्या आर्थिक वर्षांत जेमतेम ७६०जणांनी मालमत्ता कराचा भरणा ऑनलाईन केला.
गतिमान व पारदर्शी कारभारासाठी सरकार ऑनलाईन कार्यप्रणालीवर भर देण्यासाठी आग्रह धरीत आहे. भ्रष्टाचार थांबविणे व वेळेचा अपव्यय टाळणे हा या मागे मूळ हेतू आहे. सरकारचे विविध विभाग, निमशासकीय कार्यालये, स्थानिक स्वराज्य संस्थांनीही ऑनलाईन तंत्रज्ञानावर भर दिला असून, नांदेड मनपानेही कर ऑनलाईन भरण्याची सोय उपलब्ध करून दिली आहे. यातही लोकांना त्यांच्या सवडीप्रमाणे कर भरता यावा, जेणेकरून थकीत कराचे प्रमाण कमीत कमी असावे किंवा असूच नये, हाच हेतू आहे.
ऑनलाईन पद्धतीने कर भरण्यास उत्तेजन देण्यासाठी करात सवलतही देण्यात आली. या पाश्र्वभूमीवर मनपा हद्दीतील सुमारे १ लाख मालमत्ताधारकांपैकी खूपच कमीजण ऑनलाईन असल्याचे दिसून आले.
प्राप्त माहितीनुसार २०१४-१५ या वर्षांत ७६० मालमत्ताधारकांनी सुमारे ६७ लाख रुपयांचा कर ऑनलाईन पद्धतीने भरला, तर २०१५-१६ या चालू आर्थिक वर्षांत आजवर जवळपास १०० जणांनी १० ते ११ लाख रुपये कररूपाने भरले. नळधारकांपैकी २०१४-१५ या वर्षांत फक्त १३९ जणांनी ३ लाख ३९ हजार १२४ रुपये नळपट्टीपोटी महापालिकेच्या खात्यावर ऑनलाईन भरले. चालू आर्थिक वर्षांत एप्रिलपासून १३ जणांनी २९ हजार ५०६ रुपये ऑनलाईन भरले आहेत.