‘आदर्श’ चौकशी अहवाल पहिल्यांदा फेटाळणे, राहुल गांधी यांनी डोळे वटारताच अहवाल स्वीकारणे पण त्यात अशोक चव्हाण अडचणीत येणार नाहीत अशी खबरदारी घेणे, ‘सीबीआय’ने भूमिका बदलणे यावरून काँग्रेस नेतृत्वाने अशोकरावांच्या मागे ताकद उभी केल्याचे स्पष्ट होते. गांधी घराण्यावर असलेली निष्ठा त्यांच्या कामी आली आहे.
२००९ मध्ये लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत अशोक चव्हाण यांनी पक्षाला चांगले यश मिळवून दिले होते. यामुळे त्यांच्याबद्दल चांगले मत तयार झाले. महाराष्ट्राच्या राजकारणात शंकरराव चव्हाण यांना नेहमीच इंदिरा गांधी यांनी महत्त्व दिले. यशवंतराव चव्हाण यांना शह देण्याच्या उद्देशाने इंदिरा गांधी यांनी शंकररावांचा उपयोग करून घेतला. यशवंतराव चव्हाण यांच्यानंतर त्यांचे शिष्य शरद पवार यांनाही शह देण्याचे काम शंकररावांनी केले. राज्यपालांनी खटला भरण्यास परवानगी नाकारणे, ‘सीबीआय’ने सबळ पुरावा नसल्याची न्यायालयात भूमिका मांडणे, चौकशी अहवाल फेटाळण्याची कृती हे सारेच दिल्लीच्या आशीर्वादाने झाले होते. चौकशी अहवाल फेटाळण्याच्या सूचना दिल्लीतूनच मुख्यमंत्र्यांना देण्यात आल्याचे समजते. ही कृती महागात पडेल अशी भूमिका दिल्लीत मांडली गेली असतान मराठवाडय़ात पक्ष संपवायचा आहे का, असा सवाल एका बडय़ा नेत्याकडून करण्यात आला होता. चौकशी अहवाल फेटाळण्याच्या राज्य सरकारच्या कृतीबद्दल राहुल गांधी यांनी आक्षेप घेताच त्याचा फेरविचार करण्यात आला. मात्र हा अहवाल स्वीकारताना अशोक चव्हाण अडचणीत येणार नाहीत ही खबरदारी घेण्याच्या सूचना दिल्लीतूनच देण्यात आल्या होत्या. यामुळेच अशोक चव्हाण यांच्या विरोधात आधीच फौजदारी गुन्हा दाखल असल्याने चौकशी आयोगाने ठपका ठेवूनही नव्याने कारवाई करण्याचे सरकारने टाळले होते. राहुल गांधी यांच्या औरंगाबादमधील जाहीर सभेत अशोक चव्हाण यांना व्यासपीठावर स्थान देण्यात आले होते. सीबीआयने भूमिका बदलली असली तरी उच्च न्यायालायत ‘आदर्श’ प्रकरण प्रलंबित आहे. तसेच ‘पेडन्यूज’ बाबतही टांगती तलवार त्यांच्या डोक्यावर आहे.

येडियुरप्पा आणि अशोकराव !
निवडून येण्याची क्षमता लक्षात घेता अशोकरावांनाच उमेदवारी देण्यात यावी, अशीही चर्चा झाली होती. कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री येडियुरप्पा यांना भाजपने उमेदवारी दिल्याने अशोक चव्हाण यांच्या उमेदवारीचा मार्ग मोकळा झाल्याचे काँग्रेसच्या वर्तुळातून सांगण्यात आले. अशोक चव्हाण यांना उमेदवारी दिल्याने काँग्रेसची भ्रष्टाचाराला साथ असल्याचे स्पष्ट होते, अशी टीका विरोधी पक्षनेते विनोद तावडे यांनी केली आहे.