नक्षलक्रांतीचा फोलपणा उघड झाल्याचा परिणाम

गडचिरोली :  ग्रामपंचायतीच्या माध्यमातून गावाचा विकास करण्याचे स्वप्न प्रत्यक्षात उतरविणाऱ्या उपसरपंच रामा तलांडे या तरुणाची नक्षलवाद्यांनी हत्या केली. तसेच दांमरंचा येथील उपसरपंच पत्रू बलिया यांचासुद्धा याच पद्धतीने निर्घृण खून करण्यात आला. नक्षलवाद्यांना विकास नको असल्याने आदिवासींची हत्या करून त्यांना लुटणे सुरू आहे. नक्षलवादी क्रांतीचा फोलपणा उघड झाल्याने तसेच क्रांतिकारी चळवळीत आपला विकास होणार नाही हे समजून आल्यामुळे मागच्या २१ वर्षांत ६६६ नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले आहे.

उपसरपंच रामा तलांडे हा ग्रामपंचायतीच्या माध्यमातून गावाचा विकास करण्याचे स्वप्न पाहत होता. दहा वर्षे उपसरपंच असताना बुरगी ते एटापल्ली हा रस्ता त्याने बनविला व गावातले प्रश्न सोडविले होते. रामा तलांडे हा  विद्यार्थी संघटनेच्या नेतृत्वात तयार झालेला युवक होता. त्याचा स्वत:चा व्यवसायसुद्धा होता. पण, त्याने नक्षलवाद्यांच्या लुटारू विचारधारेला गावात थारा न दिल्याने अंधाराचा फायदा घेऊन त्याचा खून करण्यात आला. अशाच प्रकारे २०१५ मध्ये दांमरंचा गावातील उपसरपंच पत्रू बलिया दुर्गे याने त्याच्या गावाच्या विकासासाठी स्वप्ने पाहिली होती. ती स्वप्ने प्रत्यक्षात उतरवित असताना अहेरी एरिया कमिटीच्या लुटारू व खंडणीखोर नक्षल्यांनी उपसरपंच पत्रू दुर्गेचाही खून केला. या नक्षल्यांनी गेल्या २० वर्षांत सरपंच, उपसरपंच, अनुसूचित जाती व जमातीच्या सदस्यांना ठार मारले आहे. तरुण युवक गावाच्या विकासासाठी नेतृत्व करायला लागले तर नक्षलवादी खंडणी मागतात. ती पूर्ण न झाल्यास त्यास ठार मारतात. आदिवासी जनतेला भूलथापा देऊन फसवत आहेत, हे लक्षात आल्यामुळे नक्षल आत्मसमर्पण योजना सुरू झाल्यापासून म्हणजे २१ वर्षांत ६६६ नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले आहे. ते सर्व लोकशाहीच्या मूळ प्रवाहात परत येऊन सुखी समाधानाचे जीवन जगत आहे.

लोकशाही मार्गाने जनतेचे समर्थन मिळवून दाखवा

बंदुकीच्या जोरावर लोकांना एकत्र करणे सोपे आहे. पण, नक्षलवाद्यांमध्ये हिंमत असेल तर त्यांनी निवडणुकीच्या रिंगणात उतरून लोकशाहीच्या मार्गाने जनतेचे समर्थन मिळवून दाखवावे, असे आवाहन नक्षलविरोधी अभियानाचे विशेष पोलीस महानिरीक्षक कार्यालयातील पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन यांनी केले आहे.