डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या अभ्यास मंडळाच्या सदस्यपदी झालेल्या अनियमीत नियुक्त्यांची चौकशी करण्यात येईल असे आश्वासन राज्यपाल सी.विद्यासागर राव यांनी विरोधी पक्षेनेते धनंजय मुंडे, आमदार सतीश चव्हाण, ज्येष्ठ नेते राजेश्वर चव्हाण यांना दिले. डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या विविध प्राधिकरणांवर झालेल्या अनियमीत नियुक्त्यांबाबत सोमवारी विरोधी पक्षेनेते धनंजय मुंडे, आमदार सतीश चव्हाण यांनी राज्यपाल सी.विद्यासागर राव यांची राजभवन येथे भेट घेतली.

महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ नुसार डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या निवडणुका नुकत्याच पार पडल्या. मात्र या निवडणुकीत विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.बी.ए.चोपडे व अधिष्ठाता यांनी नवीन विद्यापीठ कायदा धाब्यावर बसवत अभ्यास मंडळावर अपात्र सदस्यांच्या नियुक्त्या केल्या असल्याचे आमदार सतीश चव्हाण यांनी राज्यपाल सी.विद्यासागर राव यांच्या निदर्शनास आणून दिले.

अभ्यासमंडळाच्या नियुक्तीसाठी विद्यापीठाने सूचना अथवा परिपत्रक काढणे गरजेचे होते मात्र विद्यापीठाने कुठल्याही प्रकारची सूचना किंवा परिपत्रक काढले नसल्याचे धनंजय मुंडे यांनी सी.विद्यासागर राव यांना सांगितले. डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू आपल्या पदाचा गैरवापर करीत असून राजकीय दबावातून त्यांनी नियुक्त्यांबाबतची पात्रता न पाहताच अभ्यासमंडळावरील सदस्यांच्या नियुक्त्या केल्या. त्यामुळे अभ्यासमंडळावर झालेल्या नियुक्त्या या बेकायदेशीर असून त्या नियुक्त्या रद्द करण्यात याव्यात व नियुक्त्यांची प्रक्रिया पुन्हा नव्याने राबविण्यात यावी अशी मागणी धनंजय मुंडे व आमदार सतीश चव्हाण यांनी राज्यपालांकडे केली.

राज्यपाल सी.विद्यासागर राव यांनी सदर प्रकरणाची गांभीर्याने दखल घेत अभ्यास मंडळावरील नियुक्त्यांबाबत समिती गठीत करून याची चौकशी करण्यात येईल व यामध्ये दोषी असणाऱ्या सर्व अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येईल असे आश्वासन धनंजय मुंडे, आमदार सतीश चव्हाण, ज्येष्ठ नेते राजेश्वर चव्हाण यांना दिले.