19 January 2021

News Flash

आंबेडकरवादी संघटनांच्या बंदविरोधात कोल्हापूरमध्ये शिवसेना आमदाराचा प्रतीमोर्चा

गाड्यांची जी तोडफोड झाली त्याविरोधात आम्ही गप्प बसणार नाही

आमदार राजेश क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली प्रती मोर्चाही काढण्यात आला असून उद्या कोल्हापूर बंदची हाकही देण्यात आली आहे.

भीमा कोरेगावमधील हिंसाचाराच्या निषेधार्थ आंबेडकरवादी संघटनांनी राज्यात बुधवारी बंदची हाक दिली असतानाच कोल्हापूरमध्ये मात्र शिवसेना आमदार राजेश क्षीरसागर यांनी या बंदविरोधात आक्रमक भूमिका घेतली. आमचा बंदला विरोध नाही, मात्र यात गाड्यांची जी तोडफोड झाली त्याविरोधात आम्ही गप्प बसणार नाही, असा इशाराच क्षीरसागर यांनी दिला आहे. या बंदविरोधात आमदार राजेश क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली प्रती मोर्चाही काढण्यात आला असून उद्या कोल्हापूर बंदची हाकही देण्यात आली आहे.

भीमा कोरेगाव येथे सोमवारी दगडफेकीत आणि हिंसाचारात एका तरुणाचा मृत्यू ओढवल्याची संतप्त प्रतिक्रिया बुधवारी देखील राज्यात उमटली. प्रकाश आंबेडकर यांनी बुधवारी महाराष्ट्र बंदची हाक दिली होती. राज्यभरात ठिकठिकाणी दगडफेकीच्या घटना घडल्या. कोल्हापूरमध्येही बुधवारी सकाळपासून तणावाचे वातावरण होते. शिवसेना आमदार राजेश क्षीरसागर यांनी बंदविरोधात प्रतिमोर्चा काढल्याने तणावात भर पडली.

क्षीरसागर समर्थकांचा मोर्चा सिद्धार्थ नगर आणि अन्य परिसरातून जात असताना जमावाने दुचाकी पेटवल्या. भीमा कोरेगावमधील घटनेचा निषेधच करतो. महाराष्ट्र बंदला आमचाही पाठिंबा आहेच. पण काही लोकांनी गाड्यांची तोडफोड करुन नुकसान केले, त्याविरोधात आम्ही गप्प बसणार नाही. म्हणूनच आम्ही प्रती मोर्चा काढला, असे राजेश क्षीरसागर यांनी सांगितले. या बंदमुळे जे नुकसान झाले, त्याची भरपाई राज्य सरकारने द्यावी, परिस्थिती नियंत्रणात आणण्यात सरकार कमी पडत आहे, असा आरोपच त्यांनी केला.

दरम्यान, कोल्हापूरमध्ये आंबेडकरवादी संघटनांच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक भूमिका घेतली. संतप्त कार्यकर्त्यांनी संभाजी चौक, शिवाजी पूल येथे रास्ता रोको केला. आंदोलकांनी केएमटी बस, वाहनांची तोडफोड केली. जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांना सौम्य लाठीमार करावा लागला. संध्याकाळी परिस्थिती पाहून कोल्हापूरमध्ये संचारबंदीबाबत निर्णय घेतला जाईल, असे पोलिसांनी सांगितले.

‘तरुण भारत’च्या कार्यालयावर जमावाने दगडफेक केली. राजारामपुरीत, बिंदू चौक यासह संपूर्ण शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला. अत्यावश्यक सेवा वगळता पेट्रोल पंप ही बंद करण्यात आली. शाळा, महाविद्यालये,क्लासेस यांना बंद मुळे सुट्टी जाहीर करण्यात आली होती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 3, 2018 6:05 pm

Web Title: bhima koregaon violence updates kolhapur shiv sena mla rajesh kshirsagar oppose maharashtra band
टॅग Kolhapur
Next Stories
1 भीमा कोरेगाव प्रकरण – रस्त्यावरची दुही टाळण्यासाठी सोशल मीडियावर एकीचं आवाहन
2 महाराष्ट्रातील विकासाला खीळ घालण्यासाठी विरोधकांनी दंगली सुरु केल्यात- रावसाहेब दानवे
3 Maharashtra bandh : हार्बर, मध्य रेल्वे आणि मेट्रोची वाहतूक विस्कळीत
Just Now!
X