भीमा कोरेगावमधील हिंसाचाराचे गेल्या दोन दिवसांपासून मुंबईत पडसाद उमटत आहे. मध्य आणि पश्चिम रेल्वेवर गेले दोन दिवस ‘रेल रोको’च्या घटना घडत असून या प्रकरणी पोलिसांनी आता कारवाईला सुरुवात केली आहे. पश्चिम रेल्वेवरील आंदोलनाप्रकरणी रेल्वे सुरक्षा दलाने १३ गुन्हे दाखल केले आहेत. तर मध्य रेल्वेवर पोलिसांकडून रात्री उशिरा गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.

भीमा-कोरेगाव येथील हल्ल्याच्या निषेधार्थ बुधवारी ‘महाराष्ट्र बंद’ची हाक देण्यात आली होती. बुधवारी बंदमुळे मुंबईची वाहतूक व्यवस्था कोलमडली. शांततामय मार्गाने बंद पाळण्याच्या नेत्यांच्या सूचना धुडकावून लावत आंदोलकांनी ठिकठिकाणी रेल्वे आणि रस्ते वाहतुकीत विघ्न आणण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे मध्य आणि हार्बर मार्गासह पश्चिम रेल्वेवरील वाहतूक बुधवारी कोलमडून गेली.

मध्य आणि पश्चिम रेल्वे मार्गावरील स्थानकांत गेले दोन दिवस वारंवार आंदोलन करून रेल रोको करण्यात येत आहे. याचा फटका प्रवाशांना बसत आहे. आता पोलिसांनी आंदोलकांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. पश्चिम रेल्वे सुरक्षा दलाने आंदोलकांविरोधात स्थानकात उपद्रव आणि सेवेत अडथळा आणल्याबद्दल १३ गुन्हे दाखल केले आहेत. लोहमार्ग पोलिसांकडूनही काही गुन्हे दाखल करण्याची प्रक्रियाही सुरू असल्याचे लोहमार्ग पोलीस आयुक्त निकेत कौशिक यांनी सांगितले.

भारिप बहुजन महासंघाने मंगळवारी रात्री बंदचे आवाहन केल्यानंतरही बुधवारी सकाळी मुंबई आणि आसपासच्या शहरांतील व्यवहार सुरळीत सुरू होते. मात्र, सकाळी आठच्या सुमारास बंदच्या समर्थनार्थ भीमसैनिक मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरले व त्यांनी संपूर्ण शहराची वाहतूक व्यवस्था रोखून धरली. पहिले आंदोलन सकाळी पावणे आठच्या सुमारास ठाणे रेल्वे स्थानकात करण्यात आले. फलाट क्रमांक एक आणि दोनवर पंधरा मिनिटे आंदोलन केल्यानंतर हे आंदोलन पुढे सरकत गेले. कांजुरमार्ग, विक्रोळी, घाटकोपर, दादर आणि दिवा, डोंबिवली, उल्हासनगर, टिटवाळा, वाशिंद स्थानकात रेल रोको करण्यात आला. तर गोवंडी स्थानकातच आंदोलनकर्त्यांनी रुळावर ठिय्या मांडल्याने दुपारी सव्वा अकरापासून हार्बर रेल्वे विस्कळीत झाली. गोवंडी स्थानकातील आंदोलन जवळपास पाऊण तास झाल्यानंतर चेंबूर, मानखुर्द येथे रेल रोको सुरु झाले. यानंतर कल्याण, डोंबिवली या भागातही रेल रोकोचा प्रकार घडला.

१५० जणांवर गुन्हे
भीमा कोरेगाव घटनेचा निषेध करण्यासाठी डोंबिवलीतील शेलार चौकात आंदोलन करणाऱ्या १५० जणांच्या विरुद्ध रामनगर पोलिसांनी दंगलीचा गुन्हा दाखल केला आहे. सोमवारी रात्री भीमा कोरेगाव घटनेचा निषेध करण्यासाठी अचानक आंदोलन सुरू केले. जमावाने रस्त्यावरून येजा करणाऱ्या १० ते १५ वाहनांची तोडफोड केली. काही प्रवाशांना दगडफेक, काचा लागल्याने जखमा झाल्या. पोलिसांनी सौम्य लाठीमार केल्यानंतर जमाव पांगला.