केंद्र शासनाच्या विविध विभागात आणि मुंबई महापालिकेत नोकरी लावतो म्हणून सुशिक्षित बेरोजगारांना कोट्यवधी रूपयांचा गंडा घालणार्‍या आंतरराज्य टोळीला हिंगोली पोलिसांनी शिताफीने अटक केली. आरोपींकडून पोलिसांनी मंत्रालयातील सचिव दर्जाचे आणि रेल्वेतील उच्चपदस्थ अधिकार्‍यांच्या नावाचे बनावट स्टॅम्प, त्यांच्या बनावट सहीचे नियुक्‍तीपत्र जप्‍त केल्याची माहिती नांदेड परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक निसार तांबोळी यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली. गुन्ह्याची व्याप्ती देशभर असू शकते, या दृष्टिकोनातून तपास सुरू असल्याचे तांबोळी यांनी सांगितले.

वसमत तालुक्यातील टाकळगाव येथील पोलीस पाटील पंडीत ढवळे यांना रेल्वेत नोकरी लावण्याचे आमिष दाखवून आरोपींनी १० लाख रूपये उकळले होते; परंतु पुढे काही दाद देत नसल्याने ढवळे यांनी पैसे परत करण्याची मागणी केल्यानंतर त्यांना रेल्वेतील नोकरीचे बनावट नियुक्‍तीपत्र दिले. विशेष म्हणजे नोकरीवर हजर न होताही त्यांना दोन महिन्याचा पगारही देण्यात आला. नोकरीवर हजर नसताना पगार मिळत असल्याची शंका ढवळे यांना आल्याने त्यांनी वसमत पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली.

तक्रारीला गांभीर्याने घेत पोलिसांनी तपास सुरू केल्यानंतर हे एक मोठे रॅकेट असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यादृष्टिने तपास करताना रविंद्र उर्फ दयानिधी संकुवा (रा.ओडिसा), अ‍ॅड. नरेंद्र विष्णुदेव प्रसाद (रा.उत्तरप्रदेश) या दोघांना नांदेड रेल्वेस्टेशन परिसरातून अटक केली. त्यांना सुंदरी दाखविताचा त्यांनी अनेकांना बनावट नियुक्‍ती पत्र देऊन फसविल्याची कबुली दिली. रॅकेटमधील उर्वरित आरोपी मुंबई, दिल्ली, लखनऊ आदी ठिकाणी असल्याचे पोलिसांना सांगितले.

या प्रकरणात सायबर सेलची मदत घेत पोलिसांनी सतीश तुळशीराम रा. लोहा आणि आनंद पांडुरंग कांबळे रा.अहमदपूर या दोघांना अटक केली. या दोघांनी आम्ही नांदेड येथे पोलीस भरती प्रशिक्षण अकॅडमी चालवून सुशिक्षित बेरोजगार मुले हेरून त्यांची फसवणूक केल्याची कबुली दिली. त्यानंतर गौतम एकनाथ फणसे मुंबई आणि अभय मेघशाम रेडकर रा. दिल्ली यास सिंधुदूर्ग येथून अटक केली. सातवा आरोपी संतोषकुमार सरोज याला उत्तरप्रदेश राज्यातील जोनपूर येथून अटक केली. सरोज याच्या राहण्याच्या ठिकाणाची झडती घेतली असता तेथे विविध मंत्रालयातील सचिव दर्जाचे आणि रेल्वेतील उच्चपदस्थ अधिकार्‍यांच्या नावांचे बनावट स्टॅम्प, नियुक्‍ती पत्र, भारत सरकार आणि उत्तरप्रदेश सरकार असे नाव लिहिलेली लिफाफे, बनावट नियुक्‍ती पत्र तयार करण्यासाठी लागणारा कागद, रेल्वेचे बनावट ओळखपत्र, अनेक सुशिक्षित बेरोजगारांचे बनावट नियुक्‍ती पत्र, एटीएम कार्ड, मोबाईल आणि आरोपींच्या बँक खात्यावर झालेले व्यवहार पोलिसांनी जप्‍त केले आहेत.

या गुन्ह्यामध्ये आरोपींनी वापरलेली १८ बँक खाती आणि या खात्यावर असलेले ११ लाख रूपये गोठविण्यात आले आहेत. तसेच आरोपींकडून रोख ५६ हजार रूपये आणि ८ लाख रूपये किंमतीची कार, ५० हजारांचे मोबाईल असा ऐवज जप्‍त करण्यात आला आहे. आरोपींनी मागील १० वर्षांत महाराष्ट्रासह ओडिसा, आंध्रप्रदेश, तेलंगणा, मध्यप्रदेश उत्तरप्रदेश, हरियाणा, दिल्ली, पश्‍चिम बंगालसह अनेक राज्यातील सुशिक्षित बेरोजगारांची फसवणूक करून कोट्यवधी रूपयांचा त्यांना गंडा घातला आहे.

ही कारवाई विशेष पोलीस महानिरीक्षक निसार तांबोळी यांच्या मार्गदर्शनाखाली हिंगोलीचे पोलीस अधीक्षक राकेश कलासागर यांच्या नेतृत्वाखाली अपर पोलीस अधीक्षक यशवंत काळे, साहाय्यक पोलीस अधीक्षक यतीश देशमुख, क्राईम ब्रान्चचे पोलीस निरीक्षक उदय खंडेराय, वसमतचे पोलीस निरीक्षक शिवाजी गुरमे यांचा सहभाग होता. केली. या प्रकरणी आणखी कोणाची फसवणूक झाली असेल तर त्यांनी वसमत पोलीस ठाणे किंवा हिंगोली स्थानिक गुन्हे शाखेकडे संपर्क करावा, असे आवाहन राकेश कलासागर यांनी केले आहे.