नेवासे विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार भानुदास मुरकुटे हे भारतीय जनता पक्षाकडून निवडणूक लढवणार असल्याची चर्चा असली तरी त्याला आता भाजपच्याच कार्यकर्त्यांनी विरोध दर्शवला आहे. दुसऱ्या पक्षातील कार्यकर्त्यांना आयात करून त्यांना उमेदवारी देऊ नये, निष्ठावंत कार्यकर्त्यांनाच उमेदवारी द्यावी, अशी मागणी बैठकीत करण्यात आली आहे. माजी आमदार मुरकुटे यांनी नेवाशातून विधानसभेची निवडणूक लढवण्याची चाचपणी सुरू केली आहे. आमदार शिवाजी कर्डिले यांनी मुरकुटे यांचे नाव पुढे केले असून भाजपचे ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडे यांच्याशी त्यांची चर्चा झाली असल्याचे विश्वसनीय वृत्त आहे. मुरकुटे यांनीही नेवाशातून विधानसभेची निवडणूक लढवण्याचे संकेत दिले आहेत. खडकाफाटा येथे मुरकुटे यांच्या वस्तीवर निवडक कार्यकर्त्यांची बैठक नुकतीच झाली. या बैठकीत भाजपने मागील निवडणुकीत जिल्हा परिषद अध्यक्ष विठ्ठल लंघे यांना उमेदवारी दिली होती. पण लंघे हे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेले. मुरकुटे यांनी निवडणूक लढवली तर ते राष्ट्रवादीचे आमदार शंकर गडाख यांचा पराभव करू शकतील असे बैठकीत स्पष्ट करण्यात आले.    
मुरकुटे हे भाजपकडून उमेदवारी मिळवण्यासाठी प्रयत्नशील असले तरी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष बाळासाहेब मुरकुटे, जिल्हा परिषद सदस्य दिलीप वाकचौरे, संभाजी दहातोंडे हेदेखील उमेदवारीसाठी उत्सुक आहेत. भाजपतील सचिन देसर्डा, अजित फाटके यांनीदेखील उमेदवारी मिळवण्याचे प्रयत्न चालवले आहेत. आज नेवासे तालुका भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांची बैठक झाली. या बैठकीत पक्षाबाहेरील लोकांना उमेदवारी देऊ नये, पक्षातील निष्ठावंतांना उमेदवारी द्यावी असा ठराव करण्यात आला. या ठरावामुळे अन्य पक्षांच्या इच्छुकांना मोठा दणका बसला आहे. यापूर्वीच्या निवडणुकांमध्ये पक्षाबाहेरील लोकांना उमेदवारी दिली गेली. निवडणुका झाल्या की हे उमेदवार पुन्हा पक्षांतर करतात. त्यामध्ये कार्यकर्त्यांची मोठी कुचंबणा होते. पक्षाशी हे नेते एकनिष्ठ राहात नाहीत. आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची लाट आली आहे. त्यामुळे काँग्रेस, राष्ट्रवादीचे अनेक नेते भाजपची उमेदवारी मिळवण्याच्या प्रयत्नात आहेत. त्यांना उमेदवारी देऊ नये, अशी मागणी बैठकीत करण्यात आली.    
बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अभिनंदनाचा ठराव करण्यात आला. तसेच पेढे वाटण्यात आले. खासदार दिलीप गांधी व खासदार सदाशिव लोखंडे यांचेही अभिनंदन करण्यात आले. बैठकीस दिनकर गर्जे, अजित फाटके, रामभाऊ खंडागळे, बाळासाहेब कुलकर्णी, संदीप पालवणे आदी उपस्थित होते.