मराठा आरक्षणावर संभाजीराजेंनी मांडलेल्या भूमिकेला भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी विरोध केला आहे. शांत राहण्याची संभाजीराजेंची भूमिका आपल्याला मान्य नाही असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे. दरम्यान यावेळी त्यांनी संघर्ष केल्यास आपण शरद पवार आणि अजित पवार यांच्या पाठीशी उभे राहू असा शब्द दिला आहे. ते कोल्हापुरात प्रसारमाध्यमांशी बोलत होते. नरेंद्र मोदी सरकारला सात वर्षे झाल्याच्या निमित्ताने भाजपाच्या वतीने करोना योद्ध्यांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमानंतर चंद्रकांत पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

मराठा आरक्षणावर संभाजीराजेंच्या भूमिकेबद्दल ते म्हणाले, “मराठा आरक्षण लगेच मिळण्यासाठी, मराठा आरक्षण मिळेपर्यंत सवलती मिळवण्यासाठी जो कोणी संघर्ष करेल त्याच्यासोबत आम्ही आहोत. संभाजीराजे तर आमचे राजे आहेत…पण संघर्ष न करता, कोविड संपल्यावर मिळालं पाहिजे असं ते म्हणाले असून आम्हाला ते मान्य नाही. कोविडचा काय संबंध? सगळं जनजीवन सुरु आहे, भ्रष्टाचार सुरु आहे. मग मराठा समाजाने कोविडचा शेवटचा रुग्ण बरा होईपर्यंत थांबायचं का?,” अशी विचारणा चंद्रकांत पाटील यांनी केली आहे.

“मराठा समाज तसाही अजित पवारांना रस्त्यावर आणल्याशिवाय राहणार नाही”, चंद्रकांत पाटलांचं अजितदादांना प्रत्युत्तर!

“पुनर्विचार याचिका दाखल करा, दोन वर्ष कायदा होता त्या काळातील तरुण, तरुणांना नोकरीचं पत्र द्या, आरक्षण मिळेपर्यंत सवलती द्या, मागास वर्ग नेमा या गोष्टी मी सांगितल्या असून त्याच गोष्टींचा पुनरुच्चार संभाजीराजेंनी केला आहे. संभाजीराजेंच्या मागण्यांना आमचा पाठिंबा आहे, पण त्यांची कृती सरकारला सहकार्य करण्याची, कोविडमुळे शांत बसण्याची असेल तर ती आम्हाला मान्य नाही,” असं चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केलं आहे.

“सरकारच्या मानगुटीवर बसून आरक्षण मिळवण्याची संभाजीराजेंची भूमिका असेल तर आम्ही खांद्याला खांदा लावून आहोत. संघर्ष करुन मराठा समाजाला न्याय मिळवून देण्याची भूमिका शरद पवार, अजित पवारांची जरी असेल तर त्यांच्या मागे पहिला शिपाई म्हणून मी उभा असेन,” असं चंद्रकांत पाटील यांनी यावेळी जाहीर केलं.

खासदार संजय राऊत यांच्यावर टीका करताना चंद्रकांत पाटील यांनी, “संजय राऊत यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेसमोर शांतपणे बसावे. अन्यथा ते त्यांना थोबाडीत लावतील,” असा टोला लगावला.

“जागतिक स्तरावर इंधनाची दरवाढ झाल्यामुळे देशातही दरवाढ होत आहे. काही राज्यांनी आपले कर कमी केल्याने तेथे दर कमी आहेत. महाराष्ट्रातील आघाडी सरकारने कर कमी करून नागरिकांना दिलासा द्यावा. त्यांनी टीका करू नये,” असा पलटवार चंद्रकात पाटील यांनी यावेळी केला.