भाजपाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमधील प्रवेशाचा मुहूर्त अखेर ठरला आहे. शुक्रवारी दुपारी २ वाजता एकनाथ खडसे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश कऱणार असल्याची घोषणा जयंत पाटील यांनी पत्रकार परिषदेत केली. एकनाथ खडसे यांनी सकाळी पक्षाचा राजीनामा दिला अशी माहिती मिळाली असून त्यामुळे त्यांना राष्ट्रवादीत घेण्यात कोणतीही अडचण नाही असंही यावेळी त्यांनी सांगितलं. दरम्यान खडसेंच्या पक्ष सोडण्याच्या निर्णयावर विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

“खडसेंच्या राजीनाम्याविषयी अधिकृत माहिती आलेली नाही. राजीनामा मिळाला तर प्रदेशाध्यक्ष योग्य निर्णय घेतील,” असं देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं आहे. खडसेंना थांबवण्याचा प्रयत्न करणार का? असं विचारण्यात आलं असता ते म्हणाले की, “आमच्या अध्यक्षांनी आधीच प्रयत्न केले आहेत. ते याविषयी अधिक सांगू शकतील”. देवेंद्र फडणवीस अतिवृष्टीचा फटका बसलेल्या जिल्ह्यांचा दौरा करत असून परिस्थितीची पाहणी करत आहेत. यावेळी ते बोलत होते.

आणखी वाचा- ओ जानेवाले, हो सके तो लौट के आना…; मुनगंटीवारांची खडसेंना भावनात्मक साद

दरम्यान खडसेंच्या राष्ट्रवादी प्रवेशाची घोषणा होण्याआधी अनेक नाट्यमय घडामोडी पहायला मिळाल्या. खडसेंनी सकाळी जयंत पाटील यांचं ट्विट रिट्विट करत आपल्या प्रवेशाचे सूचक संकेत दिले होते. या ट्विटमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका करण्यात आली होती. मात्र खडसेंनी तासाभरातच माघार घेतल्याने खडसेंच्या प्रवेशावबद्दल सस्पेन्स कायम राहिला होता.

आणखी वाचा- भाजपाचे १० ते १२ आमदार राष्ट्रवादीच्या वाटेवर; जयंत पाटील यांचा गौप्यस्फोट

ट्विटमध्ये काय लिहिलं होतं
नरेंद्र मोदींनी मंगळवारी देशवासियांना संबोधून भाषण केलं. त्यांच्या या भाषणावर टीका करणारं ट्विट जयंत पाटील यांनी केलं होतं. त्यांनी म्हटलं होतं की, “आजच्या भाषणात पंतप्रधान काहीतरी नवीन सांगतील, करोना व आर्थिक संकटावर मात करण्यासाठी मार्ग देतील, अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना दिलासा देतील असं वाटलं होतं. मात्र यापैकी त्यांनी काहीच केले नाही. महाराष्ट्राचा, देशाचा भ्रमनिरास केला”.