राज्याचे नागपूर येथे होत असलेलं हिवाळी वादळी ठरणार असल्याचं चिन्ह दिसत आहेत. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी राहुल गांधी यांनी केलेल्या वक्तव्यावरून शिवसेनेला डिवचल होतं. शिवसेना सत्तेसाठी किती लाचारी पत्करणार असं फडणवीस म्हणाले होते. फडणवीस यांच्या टीकेला काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनी उत्तर दिलं आहे.

उद्यापासून राज्याचे हिवाळी अधिवेशन सुरू होत आहे. सहा दिवस चालणाऱ्या अधिवेशनात प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या भाजपाकडून सरकारला कोडींत पकडण्याचा होण्याची शक्यता आहे. तसे संकेत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी दुपारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिले. विशेष म्हणजे सावरकरांविषयी केलेल्या विधानाचा दाखला देत चहापानावर बहिष्कारही टाकला आहे.

दुपारी झालेल्या पत्रकार परिषदेत बोलताना फडणवीस म्हणाले, “राहुल गांधी हे कधीही सावरकरांची बरोबरी करू शकत नाही. गांधी आडनाव असलं म्हणून कुणी गांधी होत नाही. मात्र, सावरकरांविषयी शिवसेनेनं घेतलेली भूमिका व्यवहार केल्यासारखी आहे. आम्ही महात्मा गांधी, जवाहरलाल नेहरू यांना मानतो. तुम्ही सावरकरांना माना, असं शिवसेना म्हणत आहे. असं चालणार नाही. सावरकरांनी देशासाठी केलेल्या त्याग विसरता येणार नाही. शिवसेना सत्तेसाठी किती लाचारी सहन करणार आहे?, असा सवाल फडणवीस यांनी केला होता.

फडणवीस यांच्या प्रश्नाला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे मंत्री बाळासाहेब थोरात यांनी उत्तर दिलं आहे. हिवाळी अधिवेशनासाठी नागपूरात दाखल झालेले थोरात म्हणाले, “राज्यातील जनतेचे प्रश्न वेगळे आहेत. अधिवेशनाचा वापर ते सोडवण्यासाठी व्हावा. तिन्ही पक्षांच्या वेगवेगळ्या भूमिका आहेत. पण, महाविकास आघाडीचा किमान समान कार्यक्रम ठरला आहे. भाजपानं पाच वर्ष सत्ता चालवली. त्यांनी कर्जमाफी दिली होती. पण, ती शेतकऱ्यांना मिळाली नाही. आम्हाला प्रश्न विचारू नये. आम्ही शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेऊ. राहुल गांधी यांनी भूमिका मांडतांना इतिहासाचा दाखला दिला. त्यावर शिवसेनेनं त्यांची भूमिका मांडली. भावाभावांमध्येही काही बाबतीत एकमत नसते. मात्र, भाजपा केवळ आमच्यात मतभेद वाट पाहत आहे,” असं थोरात यांनी सांगितलं.