जिल्हाधिकार्‍यांच्या जमावबंदी आदेशाचे उल्लंघन करुन सावरगाव घाट (ता.पाटोदा) येथे दसरा मेळावा घेऊन गर्दी जमवल्याप्रकरणी भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे, राज्यसभा सदस्य भागवत कराड, माजी मंत्री महादेव जानकरांसह पन्नास जणांविरुद्ध अंमळनेर (ता.पाटोदा) पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यानंतर आता गुन्हे दाखल करण्याचं सत्र माझ्यापर्यंत आलं तर…असं म्हणत भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांनी संताप व्यक्त केला आहे.

“अतिवृष्टी पाहणी केली, शेतकऱ्यांचे अश्रू पुसले, अनेक नेते दौऱ्यात अनेक जिल्ह्यात होते. परवानगी घेऊन दसऱ्याला भगवान बाबांच्या दर्शनासाठी गेले असता गुन्हा दाखल झाल्याची बातमी पहिली. कार्यकर्त्यांच्या नंतर हे गुन्हे दाखल करण्याचं सत्र माझ्यापर्यंत आलं तर..” असं म्हणत पंकजा मुंडे यांनी संताप व्यक्त केला आहे. त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून याबाबत प्रतिक्रिया दिली.

बीड जिल्ह्यातील सावरगाव घाट(ता.पाटोदा) येथे संत भगवानबाबांच्या जन्मस्थळी रविवार दि. २५ ऑक्टोबर रोजी दसरा मेळावा झाला. दोन वर्षाची परंपरा असलेला मेळावा करोना महामारीमुळे ऑनलाइन झाला. माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी ऑनलाइन मार्गदर्शन केले. मात्र यावेळी जिल्हाधिकार्‍यांच्या जमावबंदी आदेशाचे उल्लंघन झाल्याप्रकरणी पोलिसांनी कारवाई केली.

रविवारी रात्री उशिरा जिल्हा विशेष शाखेचे कर्मचारी किसन सानप यांच्या तक्रारीवरुन माजी मंत्री पंकजा मुंडे, राज्यसभा सदस्य भागवत कराड, माजी मंत्री महादेव जानकर, आमदार मेघना बोर्डीकर, आ.मोनिका राजळे, माजी आमदार भीमराव धोंडे, सविता गोल्हार, पाटोदा पंचायत समिती सभापती सुवर्णा लांबरुड, सरपंच राजेंद्र सानप, राजाभाऊ मुंडे व इतर पन्नास जणांविरुध्द कलम १८८, २६९, २७० आपत्ती व्यवस्थापन कायदा कलम ५१ (ब) प्रमाणे गुन्हा दाखल झाल्याची माहिती पोलिसांनी दिली.