ED अर्थात सक्तवसुली संचलनालयाने राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्याशी संबंधित जरंडेश्वर सहकारी साखर कारखान्यावर जप्तीची कारवाई केली. या कारखान्याच्या खरेदी-विक्री व्यवहारामध्ये गैरव्यवहार झाल्याचा आरोप ईडीनं केला आहे. या पार्श्वभूमीवर आता राज्यातील विरोधी पक्ष असलेल्या भाजपाकडून सत्ताधाऱ्यांना लक्ष्य केलं जात आहे. राज्यातील भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सत्ताधारी महाविकासआघाडी सरकारवर या प्रकरणावरून टीकास्त्र सोडलं आहे. “लोकशाहीच काय, संपूर्ण महाराष्ट्रच हे भ्रष्टाचाराने संपवून टाकतील. ५५ साखर कारखान्यांच्या भ्रष्टाचाराचा पैसा काढला, तर महाराष्ट्रात १० वर्षांच्या दुष्काळाचं निराकरण होऊ शकतं”, असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे.

जरंडेश्वर सहकारी साखर कारखान्याची विक्री करताना महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेने रास्त किंमतीपेक्षा अत्यंत कमी दराने ती केली. हा कारखाना अजित पवारांशी संबंधित असलेल्या कंपनीच्या आर्थिक पुरवठ्यावर जरंडेश्वर शुगर मिल्स प्रायव्हेट लिमिटेडने खरेदी केला. महाराष्ट्र राज्य सहकारी बँक घोटाळ्याप्रकरणी ईडीनं २०१९च्या निवडणुकांच्या आधीच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि राज्याचे सध्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. एकूण २५ हजार कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप ईडीनं केला आहे.

अजित पवारांनी सत्तेचा गैरवापर करुन कारखाना मिळवला – शालिनीताई पाटील

ज्यांनी केलं आहे, त्यांना भोगावं लागेल!

दरम्यान, भ्रषाचाराच्या या प्रकरणानंतर आता भाजपानं सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला आहे. “लोकशाहीच काय, पूर्ण महाराष्ट्रच हे भ्रष्टाचाराने संपवून टाकतील. ५५ साखर कारखान्यांच्या भ्रष्टाचाराचा पैसा काढला, तर महाराष्ट्रात १० वर्षांच्या दुष्काळाचं निराकरण होऊ शकतं. मी महसूल मंत्री होतो. कृषी मंत्री होतो. एका दुष्काळाचं निराकरण करण्यासाठी समजा अडीच ते तीन हजार कोटी लागतात. इथे तर २५ ते ३० हजार कोटींचा भ्रष्टाचार झाला आहे”, असं ते म्हणाले. “यात कसलं आलंय दबावतंत्र? ईडीची चौकशी राष्ट्रवादी काँग्रेसच्या राजेश टोपेंवर किंवा दिलीप वळसे पाटील यांच्यावर होत नाहीये. काँग्रेसच्याही इतर कोणत्या नेत्यावर होत नाहीये. ज्यांनी केलं आहे, त्यांना भोगावं लागेल”, असं ते म्हणाले.

सातारा : जरंडेश्वर साखर कारखाना ED कडून जप्त; अजित पवार अडचणीत येणार?

हे चाललंय काय?

अनिल देशमुख आणि अनिल परब यांच्यावरील आरोपांवरून देखील चंद्रकांत पाटील यांनी टीका केली. “बदल्यांमध्ये घेतलेला सगळा पैसा समोर येत आहे. अनिल परब म्हणतात कंत्राटदारांकडून २ कोटी घ्या. ५० कंत्राटदारांकडून १०० कोटी घ्या. अनिल देशमुख म्हणतात मुंबईतून महिन्याला १०० कोटी घ्या. हे काय चाललंय? १८ महिन्यांपूर्वी जेव्हा सरकार आलं, तेव्हाही मी म्हणालो होतो, कुणी घाबरत नाही. ज्यानी कुणी चूक केली असेल, त्याला त्याची शिक्षा भोगावीच लागेल”, असं चंद्रकांत पाटील यांनी नमूद केलं.