राष्ट्रवादी काँग्रेस आणि शरद पवार यांच्यावर आरोपांच्या फैरी झाडत साताऱ्याचे माजी खासदार उदयनराजे भोसले भाजपात दाखल झाले. त्यानंतर साताऱ्याची राजकीय गादी स्वतःकडे ठेवण्यासाठी त्यांनी मोर्चेबांधणीही सुरू केली आहे. पण, ज्या राष्ट्रवादीतून उदयनराजे भाजपात गेले. त्याच राष्ट्रवादीच्या उमेदवाराने त्यांचा पराभव केला होता. १९९९ आणि २००४ मध्ये झालेल्या निवडणुकांमध्ये उदयनराजेंना पराभवाचा सामना करावा लागला होता. विशेष म्हणजे त्यावेळी उदयनराजे हे भाजपाचे उमेदवार होते. त्यामुळे आगामी लोकसभा पोटनिवडणुकीत याची पुनरावृत्ती होणार का, याची उत्सुकता राजकीय वर्तुळाला लागली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

राज्यात सन १९९५च्या युतीचे सरकार असताना माजी मंत्री दिवंगत गोपीनाथ मुंडे यांच्या आवाहनानंतर उदयनराजे भोसले भाजपामध्ये दाखल झाले होते. त्यावेळी त्यांना महसूल राज्यमंत्रीही करण्यात आले. मात्र, त्यानंतर १९९९ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत उदयनराजे भोसले यांना साताऱ्यातून पराभवाचा झटका बसला होता. राष्ट्रवादी काँग्रेसच्या अभयसिंहराजे भोसले यांनी त्यांचा पराभव केला होता. १९९९च्या विधानसभा निवडणुकीत अभयसिंहराजेंच्या विरोधात उदयनराजेंना पराभूत व्हावं लागलं. तर २००४ च्या विधानसभा निवडणुकीत शिवेंद्रराजेंनी उदयनराजेंचा पराभव केला होता. त्यानंतर उदयनराजेंनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला, पण काँग्रेसकडून उमेदवारी मिळण्याची चिन्हे दिसत नसल्याने त्यांनी २००८ मध्ये राष्ट्रवादीला जवळ केलं.

२००९ ते २०१९ दरम्यान लोकसभेत तीन वेळा लोकप्रतिनिधित्व करणारे उदयनराजे यांचे जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या आमदारांशी कधीच पटले नाही. उदयनराजे भोसले आणि फलटणचे रामराजे नाईक निंबाळकर यांच्यातील वाद चांगलाच गाजला होता. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचा एकमात्र अपवाद वगळता राष्ट्रवादीतील इतर नेत्यांशी त्यांचे कधीच सूर जुळले नाहीत. युपीए सरकारच्या काळात उदयनराजेंना मंत्रीपदापासून दूर ठेवण्यात आल्याने आणि पक्षात महत्त्व दिले जात नसल्याने अखेर उदयनराजे यांनी पुन्हा एकदा भाजपामध्ये प्रवेश केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी एका भाषणात उदयनराजे यांना १९९९ मधील पराभवाची आठवण करून दिली आहे.

एका खुनाने निकाल बदलला
१९९९ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत उदयनराजे यांच्यासमोर खुद्द अभयसिंहराजे यांचं आव्हान होतं. मतदानाच्या पूर्वसंध्येला अभयसिंहराजे गटाचे नगरसेवक शरद लेवे यांचा खून झाला. त्यात मुख्य आरोपी म्हणून उदयनराजे भोसले यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला. त्यानंतर ही बातमी वाऱ्यासारखी पसरली आणि त्यांना अटक झाली. पुढे उदयनराजेंची या खटल्यातून निर्दोष मुक्तता झाली. पण, या प्रकरणाचा निवडणुकीवर परिणाम झाला आणि उदयनराजेंचा पराभव झाला. या प्रकरणानंतर सातारा नगरपालिकेची निवडणूक उदयनराजे मोठ्या फरकानं जिंकले आणि राजकारणात पुन्हा स्थिरावले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bjp udayanraje bhosale ncp satara maharashtra assembly constituency elections nck
First published on: 16-09-2019 at 14:43 IST