राष्ट्रवादी काँग्रेसचे युवानेते आशुतोष काळे यांचा पुतळा जाळण्यांवरून भाजपा सेना रिपाइं व राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते आज भरचौकात एकमेकाविरूध्द भिडले.ओढाओढी, हाणामारी घोषणाबाजीमुळे मुख्य रस्ता शनिवारी सकाळीच दणाणून गेला. पोलिसांच्या हस्तक्षेपामुळे कार्यकर्ते व बघ्याची पळापळी यामुळे परिसरात तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती.  पोलिसांनी कायकर्त्यांची धरपकड  केल्यानंतर महिला नगरसेविका पोलिसांना आडव्या झाल्या यामुळे मोठा गोंधळ माजला.

१६ फेब्रुवारी रोजी कोपरगांवात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्यावतींने भाजपा सेना सरकारच्या निषेधानिमित्त हल्लाबोल सभा आयोजित केली होती त्यात युवानेते आशुतोष काळे यांनी भाजपाच्या आमदार स्नेहलता कोल्हे यांच्याविशयी अपशब्द वापरून शेलकी भाषेत टिका केली ती भाजपा सेना रिपाइं कार्यकर्त्यांना चांगलीच झोंबली. त्यामुळे त्यांनी शनिवारी काळे यांचा पुतळा मुख्य रस्त्यावर भर चौकात जाळण्यांचा प्रयत्न केला.  सदर भाजपा-सेना-रिपाइं युतीचे कार्यकर्ते व महिला नगरसेविका हातात पुतळा घेऊन मोर्चाने शहरातील विघ्नेश्वर चौकात आले असता शिवाजी पुतळयाकडे दबा धरून बसलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे असंख्य कार्यकर्ते जोरात पळत आले व त्यांनी पुतळा पळवून नेला. मात्र पुतळा जाळण्यावरून राष्ट्रवादी भाजपा, सेना व रिपाइं कार्यकर्त्यांत हाणामारी झाली. शेलक्या भाषेत एकमेकांना लाखोली वाहण्यात आली.  कार्यकर्ते एकमेकांत भिडलेले पाहून बंदोबस्तासाठी उभ्या असलेल्या पोलिसांनी खबर दिल्यानंतर पोलिस निरीक्षक दौलतराव जाधव व त्यांचे सहकारी विषेश पोलिस कृती दलाचे जवान घेऊन घटनास्थळी दाखल झाले. दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांना समजून सांगण्यांचा प्रयत्न केला मात्र कार्यकर्ते ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. पोलिसांनी धरपकड चालू केली. दोन्ही गटाचे कार्यकर्ते चिडले व घोषणाबाजी करून एकाच पक्षाच्या कार्यकर्त्यांना उचलू नका. दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांना उचला अशी भूमिका मांडली. अखेर पोलिसांनी दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांना बाजूला करीत तुमचे जे काही म्हणणे आहे ते पोलिस तक्ररीत द्या पुतळा जाळण्यासाठी कोणत्याही पक्षाने लेखी पत्र दिलेले नाही त्यामुळे  जमावबंदी आदेषाचे उल्लंघन होत आहे. तुम्ही कार्यकर्त्यांनी बाजूला व्हावे अन्यथा आपल्याला लाठीमार करावा लागेल असा इशारा दिल्यावर दोन्ही जमाव शांत झाले. भाजपा सेना रिपाइं कार्यकर्ते महिला नगरसेविका जमावांने पोलिस ठाण्यांत तक्रार देण्यासाठी जात असताना पोलिसांनी मज्जाव करीत त्यांना दुसऱ्या रस्त्याने जा असे सांगितले, त्यानंतर भाजपा सेना रिपाइं कार्यकर्ते व महिला नगरसेविकांनी तहसील कचेरीत जाऊन या घटनेचा निषेध  करत नायब तहसीलदार शिवाजी सुसरे यांना निवेदन दिले.  भाजपा -सेना- रिपाइं महिला नगरसेविकांना धक्काबुक्की झाली. गचंडया पकडापकडीत धारधार नखांनी चेहऱ्याला किरकोळ जखमा झाल्या. महिला नगरसेविकांच्या मौल्यवान वस्तूसह दागदागिने गेल्याची चर्चा होती. याप्रसंगी दोन्ही बाजूने पोलिस ठाण्यांत तक्रार देण्यात आली आहे.