गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघात भाजप-शिवसेनेचे विद्यमान खासदार अशोक नेते यांनी ७७ हजार मतांची निर्णायक आघाडी घेतली आहे. नेते यांना ५ लाख ११ हजार ३१२ तर काँग्रेस आघाडीचे उमेदवार डॉ. नामदेव उसेंडी यांना ४ लाख ३३ हजार ९७२ मते मिळाली आहेत.  वंचित बहुजन आघाडीचे डॉ. रमेशकुमार गजबे यांना १ लाख ९८  हजार ७९ मते मिळाली. विशेष म्हणजे, नोटाने २४ हजार १७९ मते घेतली आहेत.

मतमोजणी सकाळी आठ वाजता कृषी महाविद्यालयात सुरू झाली. पहिल्या फेरीपासून भाजपचे अशोक नेते यांनी आघाडी घेतली.  दुसऱ्या फेरीत नेते यांना ९ हजार २०२ मते मिळाली तर काँग्रेसचे उसेंडी यांना ५ हजार ४ व वंचित बहुजन आघाडीचे डॉ. रमेशकुमार गजबे यांना ३ हजार ९१० मते मिळाली. येथून नेते यांची सुरू झालेली विजयाची घोडदौड शेवटच्या फेरीपर्यंत कायम होती. सहाव्या फेरीत नेते १० हजार ७३८ मतांनी आघाडीवर होते.

या फेरीअंती नेते यांना ३८ हजार ५५३ मते मिळाली तर काँग्रेसचे डॉ. उसेंडी यांना २७ हजार ८१५ मते मिळाली.  त्यानंतर नेते यांची आघाडी वाढत गेली. वृत्त लेखनापर्यंत नेते ७७ हजार मतांनी आघाडीवर होते.

नेते यांची सुरू झालेली विजयाची घोडदौड शेवटच्या फेरीपर्यंत कायम होती. सहाव्या फेरीत नेते १० हजार ७३८ मतांनी आघाडीवर होते.

निवडणूक निकालाचा आम्ही नम्रतापूर्वक स्वीकार करतो. काँग्रेस कार्यकर्त्यांनी एकजुटीने अथक परिश्रमाने ही निवडणूक लढवली आहे. काँग्रेस विचारधारेला प्रमाण मानून काम करते. लोकशाहीत जनमताचा निर्णय सर्वोच्च आहे. त्याचा आम्ही आदर करतो. घटना आणि लोकशाही टिकावी यासाठी आम्ही लढत राहू. काँग्रेस पक्षावर विश्वास दर्शवणाऱ्या लाखो मतदारांचे आभार.

– आमदार विजय वडेट्टीवार, विधिमंडळ उपनेता, काँग्रेस