निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा इशारा

ब्राम्हण संघाच्या विविध मागण्यांवर सरकारकडूनआश्वासनापलिकडे काही मिळाले नाही. विधानसभा निवडणुकीपूर्वी मागण्या मान्य न झाल्यास निवडणुकीवर बहिष्कार टाकण्यात येईल, असा इशारा देत समस्त ब्राम्हण समाजातर्फे शनिवारी संविधान चौकात  मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यासमोर घंटानाद आंदोलन करण्यात आले.

समाजाच्या मागण्यांसंदर्भात २२ जानेवारी २०१९ रोजी मुंबईच्या आझाद मैदानात धरणे आंदोलन करण्यात आले. त्यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी समाजाच्या मागण्या तत्वत मान्य असल्याचे सांगितले होते. मात्र त्याबाबत अजूनही कुठलाही निर्णय घेण्यात आला नाही. सर्व समाजासाठी आर्थिक विकास महामंडळ स्थापन केली जात आहेत. मात्र आमच्या समाजावरचा अन्याय कायमच आहे, असा आरोप संघटनेचे पदाधिकारी विश्वजित देशपांडे यांनी केला. ब्राम्हणांच्या सामाजिक व आर्थिक समस्या दूर करण्यासाठी ‘परशूराम आर्थिक विकास महामंडळा’ची स्थापना करावी, अशी मागणी त्यांनी केली. आंदोलनाची ही सुरूवात आहे. राज्यात  ५५ मतदार संघ असे आहेत ज्या ठिकाणी ब्राम्हण समाजाची संख्या जास्त आहे. त्यामुळे सरकारने या संदर्भात विचार करावा. अन्यथा निवडणुकीच्या काळात आंदोलनाची पुढील दिशा ठरवावी लागेल असा इशारा यावेळी देण्यात आला. यावेळी अर्चना देशमुख , संजय डबली, राम नारायण मिश्रा, मनिष त्रिवेदी, डॉ. हर्षवर्धन गोखले, राजन भूत आदी समाजाचे नेते उपस्थित होते.

अशा आहेत मागण्या

  • ब्राम्हण समाजासाठी स्वतंत्र आर्थिक विकास महामंडळ स्थापन करावे.
  • पुरोहितांना मानधन द्यावे.
  • छत्रपती शिवाजी महाराजांचे अरबी समुद्रातील भव्य स्मारक तातडीने पूर्ण करावे.
  • लंडन येथील स्वातंत्र्यवीर सावरकरांचे निवासस्थान सरकारने विकत घेऊन स्मारक तयार करावे.
  • शनिवारवाडय़ावर पेशवे सृष्टी निर्माण करण्यात यावी .
  • केजी ते पीजी शिक्षण मोफत व्हावे.
  • ग्रामीण भागातील समाजबांधवांना संरक्षण द्यावे.
  • ब्राह्मण महापुरुषांची बदनामी रोखण्यासाठी कायदा करावा.
  • विद्यार्थ्यांसाठी प्रत्येक जिल्ह्यत वसतिगृह उभारावे.