औरंगाबादमध्ये बाळासाहेब ठाकरे यांचे भव्य स्मारक उभारण्याऐवजी त्यांच्या नावाने एखादं रुग्णालय उभं करा. हे रुग्णालय खऱ्या अर्थाने बाळासाहेबांचे स्मारक ठरेल, असे सांगत एमआयएमचे आमदार इम्तियाज जलील यांनी पुन्हा एकदा शहरात रुग्णालय बांधण्याची मागणी केली. औरंगाबाद शहरात दोन वर्षापासून रुग्णालयाला जागा मिळत नाही. मात्र बाळासाहेब ठाकरे आणि गोपीनाथ मुंडे यांच्या स्मारकासाठी जागा आरक्षित करण्यात आली. त्या जागेवर रुग्णालय उभारण्याची मागणी जलील यांनी केली आहे.

महिला आणि नवजात शिशुसाठी २०० खाटांचे रुग्णालय उभारण्यात येणार आहे. त्यासाठी प्रशासकीय मंजुरी मिळाली आहे. मात्र, जागा मिळत नसल्याने दोन वर्षांपासून हा प्रस्ताव कागदावर आहे. रुग्णालयासाठी सात एकर जागेची गरज होती. एवढी जागा शहरात मिळत नसल्याने चार एक्कर जागेत दोन मजली रुग्णालय उभारण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला. मात्र अद्याप जागा मिळाली नसल्याने रुग्णालयाचा प्रस्ताव धूळ खात पडल्याचे जलील यांनी सांगितले. दुसरीकडे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि गोपीनाथ मुंडे यांच्या स्मारकासाठी सिडको आणि दुधडेरी परिसरात जागा आरक्षित करण्यात आली आहे.

विधानसभेत आपण हा मुद्दा उपस्थित केला होता. त्यावेळी ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी चांगला प्रस्ताव असल्याचे म्हटले होते. मात्र, त्यानंतर रुग्णालयाच्या जागेसंदर्भातील प्रक्रिया पुढेच सरकली नाही. शहराची वाढती लोकसंख्या लक्षात घेता नागरिकांच्या सोईसाठी लवकरात लवकर रुग्णालय उभे राहणे गरजेचे आहे. मात्र, दोन वर्षांपासून जागा मिळत नाही. आज बाळासाहेब ठाकरे किंवा गोपीनाथ मुंडे असते आणि त्यांना विचारलं असतं काय करायचं ? तर त्यांनी खात्रीशीरपणे रुग्णालय उभारायचे आदेश दिले असते. हे रुग्णालय खऱ्या अर्थानं स्मारक ठरेल आणि जनहित लक्षात घेता ते करायला हवं असे मत जलील यांनी मांडले.