18 January 2019

News Flash

डीएसकेंचा घोटाळा २ हजार कोटींचा; न्यायालयात आरोपपत्र दाखल

सुमारे ३६ हजार ८७५ पानांचे आरोपपत्र असून कुलकर्णी दाम्पत्याने २ हजार ४३ कोटींचा घोटाळा केल्याचे आरोपपत्रात म्हटले आहे.

डी एस कुलकर्णी (संग्रहित छायाचित्र)

ठेवीदारांची फसवणूक केल्याप्रकरणी बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी आणि त्यांची पत्नी हेमंती यांच्याविरुद्ध गुरुवारी गुन्हे शाखेने न्यायालयात आरोपपत्र दाखल केले. सुमारे ३६ हजार ८७५ पानांचे आरोपपत्र असून कुलकर्णी दाम्पत्याने २ हजार ४३ कोटींचा घोटाळा केल्याचे आरोपपत्रात म्हटले आहे.

ठेवीदारांची फसवणूक केल्याप्रकरणी बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी हे अडचणीत आले आहेत. फेब्रुवारीमध्ये पोलिसांनी दिल्लीतून डीएसके आणि त्यांची पत्नी हेमंती यांना अटक केली होती. याप्रकरणात पोलिसांनी अखेर गुरुवारी न्यायालयात आरोपपत्र सादर केले. ४ गाड्यांमध्ये भरुन हे आरोपपत्र न्यायालयात आणण्यात आले. अपर सत्र न्यायाधीश जे टी उत्पात यांच्या न्यायालयात हे आरोपपत्र सादर करण्यात आले. दरम्यान, न्यायालयाने डीएसकेंना २५ मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

दरम्यान, गुरुवारी पोलिसांनी या प्रकरणात डीएसके समुहाच्या फायनान्स विभागाचे प्रमुख विनयकुमार बडगंडी यांना अटक केली आहे. बुधवारी पोलिसांनी डीएसकेंच्या जावयासह दोघांना अटक केली होती. केदार वांजपे, सई वांजपे आणि वरिष्ठ अधिकारी धनंजय पाचपोर अशी या तिघांची नावे होती. केदार वांजपे हे कुलकर्णी यांच्या भावाचे जावई असून कुलकर्णी यांनी सईच्या नावाने जमीन खरेदी केली होती.

First Published on May 17, 2018 2:12 pm

Web Title: builder d s kulkarni cheating case police file chargesheet in pune court