एप्रिल आणि मे महिन्यात होणाऱ्या निवडणुका लक्षात घेता सीएची परीक्षा पुढे ढकलण्यात आल्याचे भारतीय सनदी लेखापाल संस्थेने (आयसीएआय) जाहीर केले आहे. ही परीक्षा 2 ते 17 मे दरम्यान होणार होती.

लोकसभा निवडणुकांमुळे सीएची परीक्षा पुढे ढकलण्यात आल्याचे आयसीएआयने सोमवारी जाहीर केले. ही परीक्षा अगोदर 2 ते 17 मे दरम्यान होणार होती. मात्र, आता ही परीक्षा 27 मे ते 12 जून या कालावधीत होणार आहे. यासाठीचे सुधारित वेळापत्रक लवकरच जाहीर केले जाईल, असेही ‘आयसीएआय’ने म्हटले आहे.

सीएच्या परीक्षेसाठी इच्छुक असलेले विद्यार्थी icaiexam.icai.org या संकेतस्थळावर लॉग इन करुन अर्ज करु शकतात. देशभरातील 139 परीक्षा केंद्रावर ही परीक्षा पार पडणार आहे. याशिवाय परदेशातही पाच केंद्रावर ही परीक्षा पार पडणार आहे.

दरम्यान, सोमवारी लोकसभा निवडणुकांमुळे मुंबई विद्यापीठानेदेखील सोमवारी परीक्षांच्या वेळापत्रकात बदल करत पाच दिवसांच्या विविध परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार २२ ते २४ आणि २९ व ३० एप्रिल या दिवशी होणाऱ्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत.

महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात २३ एप्रिलला रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक, पुणे या जिल्ह्यंत व सिल्वासा या केंद्रशासित प्रदेशात मतदान होणार आहे. २९ एप्रिल या दुसऱ्या टप्प्यात मुंबई, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर व रायगड (मावळ) या जिल्ह्यांमध्ये मतदान होईल. त्यामुळे पहिल्या टप्प्यातील मतदानासाठी २२, २३ व २४ एप्रिल असे तीन दिवस तर दुसऱ्या टप्प्यातील मतदानासाठी २९ व ३० एप्रिल अशा एकूण पाच दिवसांत नियोजित असलेल्या परीक्षा पुढे ढकलण्यात येणार आहेत. या पाच दिवसांमध्ये विविध परीक्षा आहेत. पुढे ढकललेल्या परीक्षांच्या सुधारित तारखा व वेळापत्रक विद्यापीठातर्फे लवकरच जाहीर करण्यात येणार आहेत.

पहिल्या टप्प्यात २३ एप्रिल रोजी होणाऱ्या निवडणुकीपूर्वी विद्यापीठाअंतर्गत असलेली अनेक महाविद्यालये निवडणुकीची केंद्रे म्हणून कार्यरत असतील. निवडणुकीच्या एक दिवस आधी मतदान केंद्रासाठी निवडणूक आयोग ही महाविद्यालये ताब्यात घेतो. त्यामुळे एक दिवस आधी होणारी म्हणजेच २२ एप्रिलला होणारी परीक्षा पुढे ढकलावी लागणार आहे.