धवल कुलकर्णी

सध्या देशावर करोनाचं संकट आहे. वारंवार हात धुवा, सॅनिटायझर वापरा असं आवाहन करण्यात आलं आहे. अशात बाजारातून सॅनिटायझर विकत घेत असाल तर सावधगिरी बाळगा. कारण अन्न आणि औषध प्रशासनाने टाकलेल्या धाडींमध्ये अप्रमाणित सॅनिटायझर्स तयार करुन त्याची विक्री करत असल्याची बाब समोर आली आहे.  काही समाजकंटक राष्ट्रीय संकटातही स्वतःचा फायदा करुन घेण्याची संधी साधत आहेत.

अन्न व औषध प्रशासन खात्याचे मंत्री डॉक्टर राजेंद्र शिंगणे यांनी लोकसत्ता डॉट कॉम ला सांगितले की त्यांच्या आत्तापर्यंत साधारणपणे ३२ ठिकाणी धाडी टाकून आम्ही ५० जणांच्या विरोधात कारवाई केली. त्यासंदर्भात पोलिसांकडे तक्रारीही केल्या आहेत. या कारवायांमध्ये १ कोटी ५३ लाख रुपये किंमतीची सब स्टँडर्ड सॅनिटायझर्स जप्त करण्यात आली आहेत. या हँड सॅनिटायझर्सचा फॉर्म्युला योग्य नव्हता हेदेखील समोर आलं आहे असंही शिंगणे यांनी स्पष्ट केलं.

शिंगणे यांनी दिलेल्या माहितीनुसार, मागील आठ दिवसांमध्ये अन्न व औषध प्रशासन खात्याच्या अधिकाऱ्यांनी साडेचार हजार दुकानांची तपासणी केली. काही कारवायांमध्ये मी स्वतःही सहभागी झालो होतो असंही शिंगणे यांनी सांगितले. काही दुकानांमध्ये एक्स्पायरी डेट संपलेल्या वस्तूही विक्रीसाठी ठेवण्यात आल्याचं निदर्शनास आल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.

आत्तापर्यंत सहा दुकानांविरोधात MRP न लावता मास्क विकल्याबद्दलही कारवाई करण्यात आली. काहीजण साधा कपडा घेऊन एक किंवा दोन थरांचे मास्क बनवून विकत आहेत असंही समोर आल्याचंही शिंगणे यांनी स्पष्ट केलं. आत्तापर्यंत मुंबई, ठाणे, भिवंडी, नाशिक औरंगाबाद आणि नागपूर या शहरांमधील ३२ ठिकाणी धाडी टाकण्यात आल्या आहेत असंही त्यांनी सांगितलं.

करोनाशी लढण्यासाठी हँड सॅनिटायझरचा वापर केला जातो. मात्र हँड सॅनिटायझर नसेल तर साबणाने स्वच्छ हात धुणेही प्रभावी ठरते हे शिंगणे यांनी आवर्जून सांगितले. तसेच सॅनिटायझरच्या वापरामुळे हात रखरखीत आणि खरखरीत होऊ शकतात असंही त्यांनी स्पष्ट केलं.