News Flash

मराठी पाठय़पुस्तकात प्रथमच व्यंगचित्रकला

पाठय़पुस्तक निर्मिती मंडळाने हे पाठय़पुस्तक देखण्या व नेटक्या स्वरूपात प्रसिद्ध केले आहे.

caricature in Marathi textbook

मधुकर धर्मापुरीकर यांच्या लेखाचा पाठय़पुस्तकात समावेश

नांदेड येथील व्यंगचित्रांचे संग्राहक आणि अभ्यासक मधुकर धर्मापुरीकर यांचा, ‘हास्यचित्रांतील मुलं’ हा लेख इयत्ता नववीच्या ‘कुमारभारती’ पाठय़पुस्तकात या वर्षी समाविष्ट करण्यात आला आहे. यानिमित्ताने व्यंगचित्रांची उदाहरणे देऊन या कलेचा परिचय देणाऱ्या लेखनाचा मराठी पाठय़पुस्तकात प्रथमच समावेश होतो आहे.

व्यंगचित्रकला हा अत्यंत लोकप्रिय पण दुर्लक्षित कलाप्रकार आहे. चित्रकलेचा पुढचा टप्पा असणारी ही कला आता कुठेही शिकवली जात नाही. परिणामी तिची नोंद घेतली जात नाही. शालेय पाठय़पुस्तकांतील या लेखाच्या समावेशामुळे संस्कारक्षम वयातील मुलांची व्यंगचित्रकलेबद्दल अभिरुची विकसित होण्यासाठी मदत होणार आहे.

यापूर्वी ज्येष्ठ व्यंगचित्रकार शि. द. फडणीस यांची हास्यचित्रे प्राथमिक विभागातील गणिताच्या पुस्तकांसाठी बालभारतीने घेतली होती. तसेच नववीच्या जुन्या अभ्यासक्रमात जयदेव डोळे यांचा ‘व्यंगचित्रे आणि वृत्तपत्रे’ हा लेख समाविष्ट करण्यात आला होता. या वर्षीपासून धर्मापुरीकरांच्या लेखनाद्वारे व्यंगचित्रकलेवरील आस्वादक लेखनाचा प्रथमच समावेश होत आहे.

पाठय़पुस्तक निर्मिती मंडळाने हे पाठय़पुस्तक देखण्या व नेटक्या स्वरूपात प्रसिद्ध केले आहे. धर्मापुरीकरांचा हा लेख ‘अक्षरभारती’ (द्वितीय भाषा)मध्येही समाविष्ट करण्यात आला आहे. मधुकर धर्मापुरीकरांनी व्यंगचित्रकलेवर विपुल आस्वादक लेखन केले असून, त्यांचे संग्रह प्रकाशित आहेत. तसेच व्यंगचित्रकलेवरील स्लाइड-शोचे सादरीकरण अनेक ठिकाणी केले आहे. प्रस्तुत लेखाचा पाठय़पुस्तकामध्ये समावेश झाल्याने मधुकर धर्मापुरीकर यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 1, 2017 3:40 am

Web Title: caricature first time in marathi textbook
Next Stories
1 राज्यभरातील सव्वालाख शिक्षकांचा जीव टांगणीला
2 सरकारकडून २७ शहरांमधल्या आवाजांची मापं काढणं सुरू
3 श्रीगोंद्यात गावगुंडाकडून अल्पवयीन मुलीला मारहाण
Just Now!
X