रायगड जिल्ह्य़ातील वडखळ परिसरात कावीळ साथीचा उद्रेक झाला आहे. दूषित पाणीपुरवठय़ामुळे आतापर्यंत २२ जणांना काविळीची लागण झाल्याचे आरोग्य विभागाने केलेल्या पाहणीत निष्पन्न झाले आहे. यातील दोघांची प्रकृती चिंताजनक असून, त्यांना उपचारांसाठी मुंबईतील कस्तुरबा गांधी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
वडखळ, वावे, बोरी, नवेगाव, इंजणवाडी या परिसरात ही लागण झाली आहे. दूषित पाण्यामुळे ही साथ उद्भवल्याचे आरोग्य विभागाने केलेल्या पाहणीत निष्पन्न झाले आहे. ५ हजार ७५९ लोकवस्तीच्या या परिसराला शहापाडा धरणाच्या पाणीपुरवठा योजनेतून पाणीपुरवठा केला जात होता, मात्र, पाणीपुरवठय़ाची पाइपलाइन गटारांमधून जात असल्याने तसेच ही पाइपलाइन ठिकठिकाणी फुटलेली असल्याने हे पाणी दूषित होत होते. यामुळे या विभागातील २२ जणांना कावीळीची लागण झाली आहे. साथीचा उद्रेक झाल्याचे लक्षात आल्यावर आरोग्य विभागाने या परिसराची पाहणी केली असून, १० संशयित रुग्णांचे रक्त तपासणीसाठी मुंबईस पाठविण्यात आले आहे. ३९ गरोदर महिलांवर प्रतिबंधात्मक उपचार सुरू करण्यात आले आहेत. या महिलांना गॅमाग्लोबिनची इंजेक्शन्स दिली जाणार असल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. हुकूमचंद पाटोळे यांनी सांगितले.
   खबरदारीची उपाययोजना म्हणून प्राथमिक आरोग्य केंद्रांवर डॉक्टरांचे एक पथक तैनात ठेवण्यात आले असून क्लोरिनेशन प्िरक्रया सुरू करण्यात आली आहे. गावात लिव्हो ५२ च्या गोळ्यांचे वितरण सुरू करण्यात आले आहे. तरीही डोळे पिवळे पडणे, लघवी पिवळी होणे, भूक न लागणे यांसारखी लक्षणे दिसल्यास रुग्णांनी तातडीने प्राथमिक आरोग्य केंद्राशी संपर्क साधण्याचे आवाहन त्यांनी केले आहे. गावातील लोकांना पाणी उकळून पिण्याचा आणि तेलकट, तसेच मासे-मटण असे पचण्यास जड असणारे पदार्थ न खाण्याचा सल्ला आरोग्य विभागाकडून देण्यात आला आहे.