अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यू प्रकरणी आता महाराष्ट्रातील राजकारण चांगलेच तापले आहे. त्यातच आता बिहार भाजपाचे प्रवक्ते निखिल आनंद यांनी केंद्रीय तपास यंत्रणेने (सीबीआय) सुशांतच्या मृत्यू प्रकरणामध्ये शिवसेनेचे खासदार संजय राऊत आणि महाराष्ट्राचे पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांची चौकशी केली पाहिजे असं मत व्यक्त केलं आहे. इतकचं नाही तर आनंद यांनी राऊत आणि आदित्य यांनी नार्को टेस्ट करण्याचीही मागणी केली आहे. भाजपाचे अधिकृत प्रवक्ते असणाऱ्या आनंद यांनी या प्रकरणाशी संबंधित पुरावे आणि साक्षीदारांमध्ये या दोघांनी आफरातफर केल्याचा आरोपही केला आहे. संजय राऊत यांनी सामनामधील लेखातून पत्रकार अर्णब गोस्वामीबरोबरच सुशांतचे वडील के. के. सिंह, भाजपा आणि बिहारचे डीजीपी गुप्तेश्वर पांडे यांच्यासंदर्भात अनेक प्रश्न उपस्थित केले होते. याच लेखाचा संदर्भ देत भाजपाच्या प्रवक्त्याने राऊत आणि आदित्या यांची चौकशी करण्याची मागणी केली आहे. यासंदर्भातील व्हिडिओ आनंद यांनी ट्विट केला आहे.

नक्की पाहा >> भाजपाच्या तिकीटासाठी निवृत्तीपासून CBI चौकशीपर्यंत; जाणून घ्या बिहारचे डीजीपी गुप्तेश्वर पांडेंचा प्रवास

“सुशांतच्या मृत्यूनंतर सामनामध्ये एक लेख लिहिण्यात आला होता. त्यानंतर अशाप्रकारचा खालच्या दर्जाचा लेख आज पुन्हा लिहिण्यात आला आहे. या लेखामधून सुशांतचे चाहते, बिहार सरकार, बिहारची जनता आणि बिहार पोलिसांचा अपमान करण्यात आला आहे. यावरुन हे थेट दिसून येत आहे की सीबीआय चौकशीमुळे शिवसेनेचे नेते घाबरलेले असून ते यामुळे चिंतेत आहेत. त्यामुळे आता सीबीआयने संजय राऊत आणि आदित्य ठाकरेंचीही चौकशी करायला हवी असं वाटतं. या दोघांनी नार्को टेस्ट झाल्यास या रहस्यावरुनही पडदा उठेल. शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे सर्व वरिष्ठ नेत्यांकडे या संदर्भात प्रश्नार्थक नजरेने पाहिलं जातं आहे. त्यामुळे फक्त अदित्य ठाकरेच नाही तर काँग्रेचे नेते राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांनीही सुशांत सिंह प्रकरणासंदर्भात बोलंल पाहिजे आपलं मौन सोडलं पाहिजे,” असं आनंद यांनी व्हिडिओत म्हटलं आहे. तसेच ज्या पद्धतीचं राजकारण महाराष्ट्र सरकार करत आहे ते दूर्देवी, न्यायाला विरोध करणारं आहे, अशी टीकाही आनंद यांनी केली आहे. पुरावे मिटवले जात आहेत त्यांच्याशी छेडछाड केली जात आहे या सर्वांची सीबीआयने दखल घेतली पाहिजे अशी मागणी आनंद यांनी व्हिडिओत केली आहे.

संजय निरुपम यांनीही केली टीका

काँग्रेसचे नेते संजय निरुपम यांनाही शिवसेनेच्या खासदाराने सुशांतच्या कुटुंबावर खालच्या स्तरावर जाऊन वक्तव्य केल्याबद्दल टीका केली आहे. “शिवसेनेच्या खासदाराने सुशांत सिंह राजपूतच्या कुटंबाबद्दल अत्यंत खालच्या दर्जाचे वक्तव्य केलं आहे. प्रत्येक कुटुंबामध्ये काही ना काही गोष्टी असतात. शिवसेनच्या लोकांच्याही अनेक अशा गोष्टी आहेत. मात्र सुशांतचा मृत्यू हा संवेदनशील विषय आहे. शिवसेनेला यासंदर्भात संवेदनशीलता दाखवणे गरजेचे आहे,” असं ट्विट निरुपम यांनी केलं आहे.

संजय राऊत यांचं आवाहन

सुशांत सिंह मृत्यू प्रकरणी हिंमत असेल तर आदित्य ठाकरे यांचं नाव घ्यावं असं खुलं आव्हानच शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिलं आहे. “आदित्य ठाकरेंचा या सर्व प्रकरणाशी काय संबंध? हिंमत असेल तर भाजपाच्या लोकांना जाहीरपणे त्यांचं नाव घ्यावं. ते चांगलं काम करत आहेत, मदत करत आहेत. बदनामी करण्याची मोहीम सुरु असून हे चांगलं राजकारण नाही,” अशी टीका संजय राऊत यांनी केली आहे. एबीपी माझाशी बोलताना त्यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. “एका उभरत्या नेतृत्त्वाचं खच्चीकरण करण्याचा तुम्ही प्रयत्न केला तर काय फायदा होणार आहे. हे राज्याचंच नुकसान आहे. कोणत्याही पक्षातील युवा नेत्यांचं खच्चीकरण केलं जाऊ नये,” असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. आदित्य ठाकरेंच्या नावाचा उल्लेख केला जात असल्यासंबंधी विचारण्यात आलं असता संजय राऊत यांनी, बदनामी करण्याची मोहीम सुरु असून हिंमत असेल तर नाव घ्या असं आव्हान देत हे चांगल्या संस्कृतीचं राजकारण नाही अशी टीका केली.