साखर कारखानदारांचा दावा

प्रदीप नणंदकर, लातूर</strong>

आतापर्यंत उसाच्या मळीपासून  इथेनॉल तयार केले जायचे. गतवर्षी उसाच्या रसापासून थेट इथेनॉल करायला सरकारने परवानगी दिली होती. यावर्षी तयार झालेल्या अतिरिक्त साखरेपासून इथेनॉल करण्यास परवानगी देण्याचा व त्यासाठी चांगला भाव देण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला असून साखर कारखानदारीसाठी तो अतिशय लाभदायक आहे. आपल्या नॅचरल शुगर कारखान्यात हा प्रयोग आपण गोदामात शिल्लक असलेल्या साखरेतून करणार असल्याचे नॅचरल शुगरचे अध्यक्ष बी. बी. ठोंबरे यांनी सांगितले.

यावर्षी केंद्र सरकारने साखरेच्या निर्यातीला सहा हजार कोटी रुपयांचे अनुदान जाहीर केले आहे. त्यानंतर सी-हेवी, बी-हेवी इथेनॉलचे व उसाचा रस, साखरेपासून बनवलेल्या इथेनॉलचे दरही वाढवले आहेत. देशात गतवर्षीची अतिरिक्त साखर शिल्लक आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत साखरेचे भाव पडलेले असल्याने एफआरपीचा दर उसासाठी शेतकऱ्याला द्यायचा व कमी भावात साखर विकायची यामुळे साखर कारखाने तोटय़ात आहेत. साखर निर्यातीच्या मर्यादा लक्षात घेऊन गोदामात सुमारे १४५ लाख टन साखर गतवर्षीच्या हंगामाची शिल्लक आहे. या साखरेचे करायचे काय, असा प्रश्न साखर कारखान्यांसमोर होता.

बाजारपेठेत साखरेचा भाव ३१०० रुपये क्विंटल आहे. केंद्र सरकारने साखरेपासून बनवलेल्या इथेनॉलला ५९ रुपये ४८ पैसे प्रतिलिटर दर देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे साखर विकण्यापेक्षा साखरेपासून इथेनॉल तयार करून विकणे कारखान्याला परवडते.

ब्राझीलमध्ये तेथील सरकार उसाचे क्षेत्र, देशाची गरज, साखरेचे भाव लक्षात घेऊन उसापासून किती टक्के साखर बनवायची व किती टक्के थेट इथेनॉल बनवायचे हे सांगते. त्यानुसार साखर कारखाने निर्णय घेतात. आपल्याकडे याचा अंदाजच येत नसल्याने साखर कारखाने साखरेचे उत्पादन घेतात. अतिरिक्त ऊस झाला की अतिरिक्त साखर होते व कारखाने अडचणीत येतात.

नॅचरल शुगरचे अध्यक्ष बी. बी. ठोंबरे यांनी ऊस उपलब्ध नसल्याने २०१९-२० चा गळीत हंगाम सुरू करणार नसल्याचे ठरवले आहे. मात्र, कारखान्याकडे साडेसात लाख क्विंटल साखर गोदामात शिल्लक आहे. बाजारपेठेत साखरेला योग्य भाव नाही, त्यामुळे डिस्टीलरी चालू करून मळी उपलब्ध झाली तर मळी व शिल्लक साखर यापासून इथेनॉल तयार करणार असल्याचे ठोंबरे म्हणाले. यामुळे आहे त्या साखरेचा उपयोग होईल. देशात स्वदेशी इंधन मिळेल. प्रदूषण कमी करण्यात आपला हातभार लागेल, असे ते म्हणाले.

साखर क्षेत्रातील तांत्रिक तज्ज्ञ बी. बी. ठोंबरे यांनी एका क्विंटल तयार साखरेपासून सुमारे ६० लिटर इथेनॉल तयार होते व त्याचा ठोक भाव धरला तर ३६०० रुपये भाव मिळतो. गोदामात साखर पडून राहिल्यामुळे त्यावर बँकेला व्याज द्यावे लागते व सध्या साखरेचा भाव ३१०० रुपये प्रतििक्व टल आहे. इथेनॉल तयार करून विकले तर कारखान्यांना त्याचा थेट लाभ हाणार आहे. देशभरात गतवर्षीची शिल्लक साखर सुमारे १४५ लाख टन असून यावर्षी साखरेचे २८० लाख टनाच्या आसपास उत्पादन होईल. देशाची गरज २६० लाख टन इतकी आहे. तरीदेखील सुमारे १६५ लाख टन साखर शिल्लक राहते. साखर निर्यातीच्या बाबतीत आपल्या देशाचे सातत्य नाही. शिवाय जगाला लागणारी रिफाइंड  शुगर आपल्याकडे तयार होत नाही. त्यामुळे तयार होणारी आपल्याकडील साखर जी गंधकमिश्रित आहे, ती छोटय़ा देशांना विकली जाते. त्यामुळे म्हणावी तशी निर्यात होत नाही.

वारणा उद्योग समूहाचे विनय कोरे यांनी, साखरेपासून थेट इथेनॉल तयार करण्याची परवानगी देण्याचा निर्णय योग्य असला तरी या इथेनॉलला दिलेला भाव हा अतिशय कमी आहे. साखरेपासून इथेनॉल तयार करण्याला प्रतिलिटर आठ ते नऊ रुपये खर्च येतो. त्यामुळे सध्याच्या साखरेच्या भावापेक्षाही कमी दर मिळतो. साखरेपासून तयार केलेल्या इथेनॉलला ५९ रुपये ४८ पैसे या भावात किमान १२ रुपये वाढ करून तो ७२ रुपयांपर्यंत नेला तर साखर कारखाने  या पर्यायाचा विचार करतील, अशी प्रतिक्रिया दिली.

केंद्र सरकारने साखरेपासून थेट इथेनॉल बनविण्यासाठी दिलेले प्राधान्य हे साखर उद्योगासाठी उचललेले चांगले पाऊल आहे. यासाठी दिलेला दर थोडा आणखीन वाढवला, तर याबाबतीत साखर कारखाने या पर्यायाचा विचार करतील, अशी प्रतिक्रिया बारामती अ‍ॅग्रोचे कार्यकारी संचालक रोहित पवार यांनी व्यक्त केली.

इथेनॉलचा पर्याय हा अतिरिक्त साखरेसाठी रामबाण उपाय असून यामुळे साखर कारखानदारीसमोरील संकट दूर होण्यास मदत होणार आहे. आगामी काळात उसाच्या क्षेत्राचा अंदाज योग्य प्रमाणात उपलब्ध झाला तर त्यानुसार कारखान्यांना किती साखर तयार करायची व किती इथेनॉल करायचा हे ठरवता येईल. सांगली, कोल्हापूर, सातारा भागात पुरामुळे उसाच्या शेतीचे नुकसान झाले आहे. या खराब झालेल्या उसाचे तातडीने गाळप करून त्यापासून थेट इथेनॉलची निर्मिती केली तर शेतकऱ्याला दोन पैसे मिळतील. कारखाने चालवले जातील व देशाची इंधनाची गरज भागण्यासही हातभार लावता येईल, असे बोखारे म्हणाले.