महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांची कबुली

शिवसेनेची युती करणे ही भाजपची अगतिकता आहे, अशी कबुली महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी शनिवारी येथे पत्रकार परिषदेत बोलताना दिली. युती न झाल्यास काँग्रेसची सत्ता येईल, असेही ते म्हणाले.

भाजपची शिवसेनेशी युती करण्यासाठी अगतिकता झाले आहे का ,अशी विचारणा केली असता महसूलमंत्र्यांनी ’होय’ अशी स्पष्टपणे कबुली दिली. याच वेळी त्यांनी ही अगतिकता कशामुळे निर्माण झाली याचे विवेचन करताना याचे राजकीय परिणाम काय होतील याचे भाकीतही केले.

ते म्हणाले, भाजप आणि शिवसेनेने एकत्र येणे ही काळाची गरज आहे अन्यथा याचा फायदा काँग्रेस घेईल आणि ती पुन्हा सत्तेत येईल. पालघर लोकसभा निवडणुकीवरून भाजप शिवसेनेमधील वादाला नव्याने फोडणी मिळालेली आहे. याविषयी महसूलमंत्री पाटील म्हणाले, की दिवंगत चिंतामण वणगा यांच्या कुटुंबातून एकास उमेदवारी देण्याचे भाजपने निश्चित केले होते. पण याबाबतची खातरजमा शिवसेनेने भाजपाकडे करायला हवी होती.  पण उद्धव ठाकरे यांनी वणगा यांचे पुत्र श्रीनिवास वणगा यांची उमेदवारी परस्पर जाहीर केली असा दावा पाटील यांनी केला.